स्मार्ट बुलढाणा

“विकसित भारत २०४७”च्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरायचे आहे: जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलढाणा,(प्रतिनिधा): “भारत आज परिवर्तन, प्रगती आणि आत्मविश्वासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. २०४७ पर्यंत, स्वातंत्र्याच्या शताब्दी काळात भारत एक विकसित राष्ट्र बनेल आणि त्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जावे. यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी ‘आत्मनिर्भर बुलढाणा’ घडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज येथे केले.
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेती आणि सिंचन: विकासाचा पाया
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्याच्या कृषी प्रगतीवर प्रकाश टाकला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिल्ह्यात खरीप हंगामात ७.२९ लाख हेक्टर व रब्बीत ३.७९ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पारंपरिक शेतीसोबतच २२ हजार हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण झाली असून, यंदा आणखी अडीच हजार हेक्टरचे उद्दिष्ट आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त ६.४० लाख शेतकऱ्यांना ४२९ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी २२०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून १६०० कोटी रुपये वितरित केल्याचे त्यांनी सांगितले.
निर्यातीत जिल्हा अव्वल
बुलढाणा जिल्ह्याने उद्योगाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातून ८७४ कोटी रुपयांची निर्यात झाली असून, अमरावती विभागात जिल्हा प्रथम तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आला आहे. चालू वर्षात १५०० कोटींच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून ६१२ नवे उद्योग सुरू झाल्याचे सांगत युवकांना संबोधित करताना त्यांनी स्किल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून युवकांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता “नोकरी देणारे” बनावे. डिजिटल क्रांतीसाठी प्रशासनाने “महसूल मित्र व्हॉट्सॲप चॅटबॉट”  आणि “पुनर्भू”  प्रणाली विकसित केली असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले. लोणार संशोधन आणि पर्यटन जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आयआयटी मुंबईच्या सहकार्याने संशोधन केले जात असून, पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
“मिशन परिवर्तन” व कायदा सुव्यवस्था
बुलढाणा पोलिसांनी राबवलेल्या “मिशन परिवर्तन” अंतर्गत गुन्हेगारीत १० टक्के घट झाली असून ८० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. नवीन “भारतीय नागरीक सुरक्षा संहिता” कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.
परेड आणि कवायती
पोलीस, वन विभाग आणि ९ शाळांमधील १८०० विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायती सादर केल्या. अमली पदार्थ विरोधी पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयातही उत्साह
मुख्य सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातही डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी तंबाखू विरोधी, बालविवाह व भ्रूणहत्या प्रतिबंधक शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, राजेंद्र पोळ, डॉ. जयश्री ठाकरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!