भारतीय सैन्याचे तेरावे सरसेनापतीपद (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) भूषविणाऱ्या अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचा जन्म २७ जानेवारी १९२६ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील अलिबागचे जिल्हाधिकारी होते. शिक्षण अलिबाग येथील टोपीवाला इंडस्ट्रीयल हायस्कूलमध्ये झाले. काही काळ पुण्याच्या रमणबाग शाळेतही त्यांचे शिक्षण झाले. मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात सैन्यात जाण्याची ओढ निर्माण झाली. १९४४ साली त्यांना सैन्यात तातडीची नियुक्ती (इमर्जन्सी कमिशन) मिळाली.
१९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या अरुणकुमार यांनी डेक्कन हॉर्सचे नेतृत्व केले होते. भारतीय सेनेकडे जुने अमेरिकन शर्मन रणगाडे होते. परंतु प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करत अरुणकुमार यांनी आपल्या कुशल नेतृत्वाचा परिचय घडविला. आपल्या तुकडीची घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करत खेमकरण विभागात ३६ पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा उडविला. या लढाईत पाकिस्तानी सैन्याने सुमारे शंभरेक रणगाडे मागे सोडून माघार घेतली. या लढाईनंतर पाकिस्तानला नाक मुठीत धरून युद्धविराम पत्करावा लागला. अरुणकुमार वैद्य यांना या शौर्यासाठी दि.६ सप्टेंबर १९६५ रोजी ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले. त्यांना दोन वेळा महावीर चक्र प्रदान करण्यात आले. सुमारे चाळीस वर्षांची सेवा अतिशय उत्तम प्रकारे बजावून अरुणकुमार वैद्य सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते पुण्यात कोरेगाव पार्क येथे निवृत्तीनंतरचे जीवन सुखाने व्यतीत करण्यासाठी राहायला आले.
‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’चा सूड घेण्यासाठी देशद्रोही खलिस्तानवादी अतिरेक्यांनी वैद्य यांच्या हालचालींवर नजर ठेवून १० ऑगस्ट १९८६ रोजी त्यांची हत्या केली. वैद्य यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ हा सन्मान देऊन सरकारने त्यांच्या देशसेवेचा गौरव केला. जनरल वैद्य यांचे लष्करी नेतृत्त्व अनुपम होते. त्यांनी आपल्या व्यापक आणि दीर्घकालीन अनुभवाच्या बळावर भारतीय सेनेला कुशल नेतृत्त्व देऊन यशाची कमान चढती राखली. अरुणकुमार वैद्य यांचे शिक्षण जेथे झाले त्या अलिबाग येथील टोपीवाला इंडस्ट्रियल हायस्कूलला ‘जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल’ असे नाव देण्यात आले आहे. आज त्यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏