अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): वाघोळा शिवरा तून एका अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा आज २७ जानेवारीच्या सकाळी दसरखेड पोलिसांत दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा होत असतानाच दुसरीकडे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, उपरोक्त अपहृत बालकाचा मृतदेह पूर्णा नदीच्या पात्रात आढळून आल्याने प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून श्यामने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे सकाळी दाखल करण्यात आलेल्या अपहरणाचा गुन्ह्यात आता सायंकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाघोळा (ता.मलकापूर) येथील रहिवासी असलेले शेतकरी तथा कीर्तनकार सचिन कडू कांडेलकर (वय ५० वर्षे) यांचा मुलगा श्याम सुनील कांडेलकर (वय १६ वर्षे) हा २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास वाघोळा शिवारात होता. बराच वेळ उलटूनही श्याम घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावातील सर्व संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र, श्यामचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे श्यामचे वडील सचिन कांडेलकर यांनी दसरखेड एमआयडीसी पोलिसांत अपहरणाची तक्रार दिली होती. सदर बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करून तातडीने तपास चक्रे फिरवली. दरम्यान, सायंकाळी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात श्यामचा मृतदेह मिळून आला असून त्याने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.
असा लागला छडा
गावात कोणी मयत झाल्यास त्याच्या अंत्यविधीचा कार्यक्रम गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रानजीकच्या परिसरात करण्यात येतो. असेच गावात मयत झालेल्या एका व्यक्तीच्या सावडण्याचा कार्यक्रम असल्याने श्यामचे कुटुंबीय पूर्णा नदीच्या पात्राकडे गेले होते. त्यांच्या सोबत श्यामही गेला होता. सावडण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गावकरी आणि श्यामचे कुटुंब घराकडे परत आले. मात्र, श्याम घरी न येता तिथेच थांबला. घरात किरकोळ कारणावरून झालेल्या कुजबुजचा राग डोक्यात असल्याने त्याने रागाच्या भरात पूर्णा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. नदी पात्राच्या कडेला त्याची चप्पल मिळून आल्याने ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांना शंका आली. त्यांनी बुलढाणा येथून आपत्तीव्यवस्थापन पथक व गावकऱ्यांच्या मदतीने नदीपात्र धुंडाळले असता, त्यामध्ये श्यामचा मृतदेह मिळून आला. त्यामुळे श्यामचे अपहरण झाले नव्हते, तर त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.