कौटुंबिक वादातून जबर मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव: अकोला जिल्ह्यातील आमसरी (ता. खामगाव) येथे कौटुंबिक वादातून भावजय व भावावर दारूच्या नशेत हल्ला करुन त्यांना जबर मारहाण केल्याची घटना ३० जानेवारीच्या सायंकाळी आमसरी येथे घडली. या प्रकरणी जलंब पोलिसांनी तिघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अकोला जिल्ह्यातील आलेवाडी येथील रहिवासी असलेले राजेश गजानन वानखडे (रा. आलेवाडी, ता. अकोट, जि. अकोला) हे ३० जानेवारीच्या सायंकाळी त्यांची बहिणी उज्वला कुटे यांच्या कौटुंबिक वादाची माहिती मिळाली आमसरी येथे गेले होते. सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास आरोपी गजानन कुटे याने दारूच्या नशेत गटाच्या पैशावरून त्यांच्यासोबत वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता राजेश वानखडे यांना मारहाण केली. या मारहाणीत वानखेडे यांच्या नाकाला दुखापत होऊन मोठ्या प्रमाणा रक्तस्त्राव झाला. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या उज्वला कुटे यांनाही आरोपी विनोद कुटे याने लाकडी काठीने हात व पायांवर मारहाण केली. तसेच तिघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. तर संतोष कुटे यानेही त्यांना चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर जखमी भावंडांनी जलंब पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी जलंब पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी गजानन परोषोत्तम कुटे (वय ४० वर्षे), विनोद श्रावण कुटे (वय ४० वर्षे) आणि संतोष शामराव कुटे (वय ५० वर्षे) सर्व रा. आमसरी (ता.खामगाव) यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास जलंब पोलीस करीत आहेत.



