श्रीधर व्यंकटेश केतकर हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे त्यांच्या ज्ञानकोशांचे प्रमुख संपादक होते. ज्या काळात केतकरांनी ज्ञानकोशाच्या २३ खंडांचे काम केले तो काळ १९१६ ते १९२८ हा आहे. ह्या काळात खुद्द लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना ‘हे काम फार मोठे आहे, एका माणसाचे हे काम नाही’ अशा प्रकारचा सल्ला दिला होता. पण केतकरांचा निर्धार पक्का होता. त्या निर्धाराला चिकटून सर्व संकटांवर मात करीत त्यांनी १२ वर्षांमध्ये हा ऐतिहासिक महत्त्वाचा मराठी प्रकल्प पूर्ण केला. ज्ञानकोश संपत आल्यावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केतकरांचा गौरव झाला. १९२६ साली ‘शारदोपासक संमेलना’चे व १९३१ साली‘महाराष्ट्र साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते.
गोंडवनातील प्रियंवदा (१९२६), ब्राह्मणकन्या (१९३०) इ. सात कादंबऱ्या १९२६ ते ३७ या काळात लिहून केतकरांनी मराठी ललित साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण भर घातली. त्यांच्या कादंबऱ्या इतर कादंबऱ्यांहून अगदी वेगळा अनुभव वाचकांना देतात. आज त्यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.