
अभिनय बोर्डे
धाड, (प्रतिनिधी): करडी (धाड) येथील एका नामांकित हायस्कूलमधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना नेमकीस उघडकीस आली. या प्रकरणी धाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून जिल्ह्यात मुलींच्या बेपत्ता तसेच अपहरण होण्याच्या घटना एकामागे सुरूच आहे. त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
धाडवरून छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि निजाम काळापासून बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गावातील १७ वर्षे ६ महिने वयाची मुलगी “कुमारी मनिषा” (नाव बदललेले आहे) ही ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करडी (धाड) येथील विद्यालयात आपल्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आली होती. मात्र, सायंकाळचे ५.३० वाजल्यानंतरही मनिषा घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेच मिळून आली नाही.
दरम्यान, विष्णू सुनील उगले (वय २२ वर्षे) रा. रुइखेड मायंबा (ता.जि.बुलढाणा) याने मनिषाला लग्नाचे आमिष दाखवून आणि फुस लावून पळवून नेल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली. विष्णू उगले याने मनीषाच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन तिला पळवुन नेल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी मनिषाच्या आईने आज ५ फेब्रुवारी रोजी धाड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विष्णू उगले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शांताराम जाधव हे करीत आहेत. अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून पळवून नेण्याची गेल्या पाच दिवसांतील ही चौथी घटना आहे, हे विशेष! वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.



