रक्तरंजीत! लोखंडी टॉमीने महिलेच्या डोक्यावर प्रहार
चार जणांवर गुन्हा दाखल; वाघुड येथील घटना

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : वाघुड (ता.मलकापूर) येथे घरासमोर पाण्याची नळी का टाकली, या कारणावरून दोन कुटुंबांत तुफान राडा झाला. राड्यात आरोपींनी महिलेला आणि तिच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता लोखंडी टॉमीने डोक्यात प्रहार करून महिलेला गंभीर जखमी केले आहे. या रक्तरंजीत हाणामारी प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर तालुक्यात येणाऱ्या वाघुड येथील रहिवासी असलेल्या जिजाबाई ज्ञादेव बगाडे (वय ४२ वर्षे) यांचे घर आणि यातील आरोपींची जागा समोरा-समोर आहे. आज ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजता दरम्यान सुमारास निनाजी केणेकर नावाचा व्यक्ती आरोपी गोविंदा राऊत याच्या घराच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी पाईप टाकण्यासाठी गेला. तसेच तसचे त्यांनी पाण्याची नळी जिजाबाई यांच्या घरासमोर टाकली. त्यावेळी जिजाबाई यांनी ‘आमच्या जागेत नळी टाकू नको’, असे म्हणत सदर व्यक्तीला विरोध दर्शविला. केला. जिजाबाईंनी विरोध केल्याचे बघुन आरोपी गोविंदा गोपाळ राऊत याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना विटा फेकून मारण्यास सुरुवात केली. आईच्या विटांनी मारहाण होत असल्याचे बघुन जिजाबाईंचा मुलगा आणि त्यांचा पती घटनास्थळी मदतीला धाऊन गेले. त्यावेळी आरोपी गोविंदा राऊत, अन्नपूर्णा राऊत, करण राऊत आणि गौरव राऊत या चार जणांनी त्यांना देखील चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर आरोपी करण मुरली राऊत याने हातातील लोखंडी टॉमीने जिजाबाईंच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात जिजाबाई गंभीर जखमी होऊन जमिनिवर कोसळल्या. तसेच आमच्या नादाला लागल्यास, एकालाही जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देखील दिली. जिजाबाईंना जखमी अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
या प्रकरणी जिजाबाई बगाडे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या ठतक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी गोविंदा गोपाळ राऊत, अन्नपूर्णा गोपाळ राऊत, करण मुरली राऊत आणि गौरव मुरली राऊत (सर्व रा. वाघुड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), ३५१ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रामचंद्र भोपळे हे करीत आहेत.
१५ ग्रॅमची सोन्याची पोत गहाळ
दरम्यान, या वादाच्या झटापटीत आणि ओढाताणीत जिजाबाई यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत कुठेतरी पडून गहाळ झाल्याचे त्यांच्या तक्रारीत नमुद आहे.



