अडीच लाख भाविकांनी टेकला संत गजानन महाराज चरणी माथा
शेगावात गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन उत्साहात

शेगाव,(प्रतिनिधी): ‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने अवघी संतनगरी शेगाव दुमदुमून गेली. गजानन महाराज संस्थानच्या वतीने आयोजित श्रींचा १४८ वा प्रगटदिन उत्सव २ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पारंपरिक, धार्मिक प्रथा आणि परंपरेनुसार अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. तब्बल अडीच लाख भाविकांनी संत गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकवून महाप्रसादाचा लाभ घेतला.

सात दिवसांपासून सुरु असलेल्या या उत्सवाच्या दररोज पहाटे ६ वाजता काकडा आरतीने दिवसाची सुरुवात झाली. सकाळी गाथा भजन, दुपारी प्रवचन आणि सायंकाळी हरिपाठ पार पडले. रात्री ८ ते १० या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाने भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाले. या सप्ताहात प्रामुख्याने हभप राम बुवा डोंगरे, हभप मनोज बुवा कुलकर्णी, हभप अनिरुद्ध बुवा क्षीरसागर, हभप बळीराम बुवा दौंड, हभप संभाजी बुवा मेहुणकर, हभप मयुर बुवा बोडखे आणि हभप. श्रीहरी बुवा वैष्णव यांनी आपल्या रसाळ आणि मधूर वाणीतून कीर्तन सेवा दिली. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला ‘श्री महारूद्र स्वाहाकार याग’ माघ वद्य प्रतिपदेला सुरू झाला होता. माघ वद्य सप्तमीला म्हणजे आज ८ फेब्रुवारीच्या सकाळी १० वाजता या यागाची पूर्णाहूती शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली. श्रींच्या प्रगटदिनाचे मुख्य कीर्तन होऊन या उत्सवाची सांगता करण्यात आली.

१०२९ दिंड्यांचा सहभाग
यावर्षी उत्सवात एकूण १०२९ दिंड्यांनी सहभाग नोंदवून आपली सेवा अर्पण केली. संस्थानच्या वतीने वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमांची पूर्तता करणाऱ्या ८८ नवीन दिंड्यांना प्रत्येकी १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत आणि श्री माऊली पताका, असे साहित्य वितरित करण्यात आले. तर जुन्या दिंड्यांना भजन साहित्य दुरुस्तीसाठी सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्था करण्यात आली. ‘विसावा संकुल’ येथे वारकऱ्यांसाठी भोजन प्रसाद आणि चोवीस तास प्रथमोपचार केंद्राची विशेष सोय संस्थानतर्फे करण्यात आली होती, हे विशेष!

शाखांमध्येही उत्साहाचे वातावरण
केवळ शेगावच नव्हे, तर श्रींच्या पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर आणि गिरडा या सर्व शाखांमध्येही प्रगटदिन उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संपूर्ण उत्सव काळात सर्व शाखा मिळून एकूण २ लाख ३४ हजार २४० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रींच्या कृपेने आणि संस्थानच्या चोख नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडल्याची माहिती श्री संस्थानच्या वतीने देण्यात आली.



