वेगवेगळ्या दोन घटनांत दोन महिला बेपत्ता; हिवरखेड आणि बोराखेडी पोलिसांत नोंद!

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातून महिला आणि मुली अचानक बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नुकत्याच समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पहिली घटना खामगाव तालुक्यातील पाळा येथे घडली असून, मोबाईलवरून झालेल्या किरकोळ कौटुंबिक वादानंतर एक ३४ वर्षीय विवाहिता घर सोडून निघून गेल्याची धक्कादायक माहिती आहे. तर दुसरी घटना नांदुरा तालुक्यातील खैरा येथून समोर आली आहे, जिथे एक १९ वर्षीय तरुणी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली आहे. या दोन्ही प्रकरणांत अनुक्रमे हिवरखेड आणि बोराखेडी पोलिसांत बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.

हिवरखेड: कौटुंबिक वाद किंवा रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक घटना खामगाव तालुक्यातील ग्राम पाळा येथे घडली. हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक ३४ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होती. मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास स्वाती यांच्याकडे एक मोबाईल मिळून आला. हा मोबाईल कोणाचा आहे, यावरून तिचे पती (वय ३९ वर्षे) यांनी विचारणा केली. या साध्या कारणावरून पती-पत्नीत किरकोळ वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, स्वाती यांनी रागाच्या भरात रात्रीच्या वेळी घरातून कोणालाही न सांगता निघून जाण्याचा निर्णय घेतला. रात्रभर स्वाती घरी न परतल्याने पती आणि नातेवाइकांनी गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात आणि इतर नातेवाइकांकडे कसून शोध घेतला. मात्र, दोन दिवस उलटूनही तिचा कुठेही पत्ता लागला नाही. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार विलास साखरे हे करत आहेत.

नांदुरा: तालुक्यातील ग्राम खैरा येथून समोर आली आहे. येथे राहणारी एक १९ वर्षीय तरुणी अचानक घरातून बेपत्ता झाली आहे. ऐन तरुण वयातील मुलगी घरातून बेपत्ता झाल्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दिनांक २८ मे २०२६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास कोमल ही नेहमीप्रमाणे घरात होती. मात्र, दुपारनंतर ती घरातून कोणालाही काहीही एक न सांगता अचानक कुठेतरी निघून गेली. ती बराच वेळ घरी न आल्याने तिच्या आईने (वय ३७ वर्षे) शोधाशोध सुरू केली. गावकऱ्यांच्या मदतीने संपूर्ण गावात, बसस्थानक परिसरात आणि नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली. परंतु, तिचा कोणताही सुगावा लागला नाही. याप्रकरणी नांदुरा पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुपडासिंग चव्हाण हे करीत आहेत.

या दोन्ही घटनांवरून एक गंभीर सामाजिक बाब समोर येते. पहिल्या घटनेत केवळ एका मोबाईलवरून झालेल्या किरकोळ वादा मुळे एका महिलेला घर सोडावे लागले, तर दुसऱ्या घटनेत एक तरुण मुलगी अचानक निघून गेली. आजच्या वेगवान युगात कुटुंबांमधील संवाद कमी होत चालला असून, किरकोळ कारणांवरून येणारा राग तात्कालिक चुकीच्या निर्णयांना कारणीभूत ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!