चिखलीत ‘अन्न व औषध प्रशासन’ आणि पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; आठवडी बाजारातील किराणा दुकानावर छापा, हजारोंचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त!

अजय टप

चिखली,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याच्या बेकायदेशीर विक्रीविरुद्ध चिखली शहरात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. चिखली येथील आठवडी बाजार, बॉम्बे मार्केट परिसरातील ‘स्वास्तिक किराणा’ दुकानावर अन्न व औषध प्रशासन आणि चिखली पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून हजारो रुपयांचा बेकायदेशीर सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

चिखली शहरातील आठवडी बाजार परिसरातील बॉम्बे मार्केट येथे असलेल्या ‘स्वास्तिक किराणा’ दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे (वय २५ वर्षे) रा. बुलढाणा यांनी चिखली पोलिसांच्या मदतीने ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सदर दुकानावर पंचांसमक्ष अचानक छापा टाकला. ही कारवाई रात्री ९:०० वाजेपर्यंत सुरू होती. या छाप्यात दुकानाची सखोल झडती घेतली असता, शासनाने मानवी आरोग्यास घातक म्हणून प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांचा सुगंधित पानमसाला, जर्दा आणि गुटख्याचा साठा विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला आढळून आला. आरोपीजवळ या मालाच्या साठवणुकीबाबत किंवा विक्रीबाबत कोणताही परवाना अथवा वैध कागदपत्रे नव्हती.

या कारवाई एकूण १४ हजार ५४८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी स्वास्तिक किराणा दुकानाचा मालक विनोद गुलाबचंद जैन (रा.सेलूद सवना, ता. चिखली) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांत अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ ची कलम २६(२)i, २६(२)iv, २७(३)(d), २७(३)e, ३(१)(zz)(iv), भारतीय न्याय संहिताचे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार विजयकुमार गिते हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!