अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : प्रेम या शब्दाचा अर्थ आणि महत्त्वही न कळलेली तरुणाई शिक्षणाच्या वयात “सिर्फ तुम” म्हणत स्वप्न रंगवतात. आणि दोन कुटुंबीयांच्या सलोख्याच्या संबंधात वितुष्ट निर्माण करतात. असाच काहीसा प्रकार खामगाव तालुक्यातील पेडका, पातोंडा परिसरात घडला. प्रेमसंबंधाच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या आईला दुसरा कुटुंबातील सदस्यांनी लोखंडी रॉड व लाकडी काठीने अमानुष मारहाण केली. ही खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांत एकाच कुटुंबातील १३ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संतोष राऊत यांनी दिलेल्या क्रॉस तक्रारीवरून दहीभात कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.
शेगाव तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी असलेले नारायण हरीभाऊ मोरखडे (वय ५१ वर्षे) यांचा भाचा अमोल दहीभात याचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. गावातील मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे राऊत कुटुंबीयांच्या मनात अमोल दहिभाते याच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झालेला होता. याच रोषातून १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास अमोलचे घर गाठले. अमोलच्या आईने “अंबादास राऊत आणि इतर मंडळी घरी येऊन वाद घालत आहेत, तू लवकर घरी ये.” असा कॉल केल्याने अमोल तातडीने घरी पोहोचला. त्यावेळी सदर ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या अंबादास राऊत आणि संतोष अंबादास राऊत यांनी अमोल आणि त्याच्या आईवर लोखंडी रॉड आणि लाटीने हल्ला चढवला. संतोष राऊत याने लोखंडी रॉडने अमोलच्या दोन्ही पोटऱ्यांवर आणि हाताच्या दंडावर जबर प्रहार करून त्याला जखमी केले. महादेव राऊत आणि अंबादास राऊत यांनी अमोलच्या डोक्यावर, नाकावर आणि तोंडावर काठ्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता संतोष राऊत आणि चंदू राऊत यांनी अमोलच्या आईला पकडून ठेवत अंबादास राऊत यांनी त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप नारायण हरीभाऊ मोरखडे यांनी फिर्यादीवरून केला आहे.
दोन्ही कुटुंबातील भांडण विकोपाला गेल्याचे बघून गावातील पोलीस पाटील प्रकाश प्रल्हाद मुंडाले यांनी मध्यस्थी करत सदर वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. अमोलच्या काकांनी जावयाला फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यांना येण्यास सांगितले. मात्र, काही वेळातच पुन्हा वाद उफाळून आला आणि श्रीधर राऊत व अक्षय राऊत यांनी पुन्हा त्यांना काठ्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे कुटुंबातील महिला सदस्याही या मारहाणीत मागे राहिल्या नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी नारायण हरिभाऊ मोरखडे यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अंबादास राऊत, संतोष अंबादास राऊत, महादेव अंबादास राऊत, चंदू राऊत, श्रीधर राऊत, अक्षय राऊत, शिवानी महादेव राऊत, संगीता महादेव राऊत, विजय संतोष राऊत, साक्षी महादेव राऊत, पूनम चंद्रकांत राऊत, शोभा अंबादास राऊत, भक्ती संतोष राऊत सर्व रा.पेडका, पातोंडा (ता. खामगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (२), ११८ (१), १८९ (२), १८९ (४), आणि ७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बाळकृष्ण फुंडकर हे करीत आहेत.
दहीभात कुटुंबाविरुद्धही गुन्हा दाखल
प्रेमसंबंधाच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी संतोष अंबादास राऊत (वय ३८ वर्षे) यांनी देखील फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घराशेजारील प्लॉटवर जळतणाची लाकडे व खुंट्या आणण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या भागवत जनार्दन दहीभात आणि रुख्माबाई जनार्दन दहीभात यांनी संतोष राऊत यांचे दोन्ही हात पकडले, तर अमोल रमेश दहीभात आणि जनार्दन दहीभात यांनी काहीही न बोलता हातातील लोखंडी रॉड आणि काठीने संतोष राऊत यांच्या डोक्यावर वार केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात संतोष राऊत यांचे डोके फुटून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. चंद्रकांत राऊत आणि गणेश राऊत यांनी सदर वाद सोडवला. मात्र, घटनास्थळावरून जाताना “आज सुटला, पुढच्या वेळेस तुझा गेम करून टाकू”, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी भागवत दहीभात, रुख्माबाई दहीभात, अमोल दहीभात आणि जनार्दन दहीभात यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळकृष्ण फुंडकर हे करत आहेत.