क्राईम जगत
खळबळजनक: मोबाइल धारकाच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या!
धंदा करते म्हणत बदनामीची दिली धमकी,अंजनी बुद्रुक येथील घटना

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत यणाऱ्या अंजनी बुद्रुक (ता.मेहकर) येथील महिलेला एका अज्ञात व्यक्तीने वारंवार फोनवरून बदनामी करण्याची धमकी दिली. त्याच्या त्रास सहन न झाल्याने सदर विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत असून या प्रकरणी डोणगाव पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया आणि मोबाइलच्या युगात आता धमक्या आणि बदनामीचे सत्र थेट जीवावर उठू लागले असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या दर्शन अर्जुन लाड (वय २५ वर्षे) यांच्या आईला १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते रात्री ८ च्या दरम्यान एका अज्ञात नराधमाने सतत फोन करून “तू गावात धंदा करत आहे, तुझे लोकांसोबत लफडे आहे, मी तुझी पूर्ण गावात बोंब करतो,” अशा अर्वाच्य भाषेत या महिलेला धमकावले. बदनामीच्या मानसिक त्रासाला आणि वारंवार येणाऱ्या फोन कॉल्सना कंटाळून शेवटी पीडित महिलेने घरातील उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. कुटुंबीयांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. एका फोन कॉलमुळे हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. केवळ संशयावरून किंवा बदनामीच्या धाकाने एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत या विकृत मानसिकतेची मजल गेलीच कशी?, असा संतप्त सवाल उपस्थित होत असून या गुंडांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
याप्रकरणी दर्शन अर्जुन लाड यांनी डोणगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१ (४) आणि ३५६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार आरीफ शेख हे करीत आहेत.



