मलकापुर: जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरातील संत रोहिदासनगर भागात जुन्या वादाची कुरापत काढून एका २१ वर्षीय तरुणाला लोखंडी कड्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मलकापूर शहरातील संत रोहिदासनगर परिसरात राहणारे विरेंद्र भारत पठ्ठे (वय २१ वर्षे) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. विरेंद्र आणि आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. याच वादाचे पर्यवसान १७ फेब्रुवारी रोजी हाणामारीत झाले. विरेंद्र हे आपल्या घरासमोर असताना आरोपी विशाल रामलाल बछीरे (वय २५ वर्षे) आणि प्रमोद नंदु खुर्दे (वय २४ वर्षे) हे त्या ठिकाणी गेले. यावेळी आरोपी विशाल याने जुन्या वादाचा राग मनात धरून आपल्या हातातील जड कड्याने विरेंद्र यांच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात विरेंद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. केवळ कड्याने मारूनच आरोपी थांबले नाहीत, तर विशाल आणि प्रमोद या दोघांनी विरेंद्र यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी भररस्त्यात शिवीगाळ करत “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
याप्रकरणी विरेंद्र यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील पोलीस अंमलदार रवींद्र दळवी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!