स्मार्ट बुलढाणा

धाडनगरीत पार पडला शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा

रोषणाईने उजळले स्मारक आणि शिवगर्जनांनी दुमदुमला परिसर!

अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी…” समर्थ रामदास स्वामींनी ज्यांचे वर्णन अशा शब्दांत केले, त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धाडनगरीत अत्यंत देदीप्यमान आणि मंगलमय वातावरणात पार पडली. या सोहळ्याने उपस्थित शिवभक्तांना थेट शिवकाळाची अनुभूती दिली.

 

जयंतीच्या निमित्ताने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवशंभू स्मारक हे आकर्षणाचे केंद्र ठरले होते. स्मारकावर करण्यात आलेली आकर्षक फुलांची आरास आणि डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण चौक जणू शिवतेजाने न्हाऊन निघाला होता. रात्रीच्या वेळी झळाळणारे हे स्मारक पाहताना प्रत्येक शिवभक्ताचा उर अभिमानाने भरून येत होता.
सोहळ्याची सुरुवात अत्यंत पवित्र वातावरणात झाली. उगवत्या सूर्याची पहिली किरणे जेव्हा शिवरायांच्या मूर्तीवर पडली, तेव्हा व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन आणि महाआरती पार पडली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. तत्पूर्वी करण्यात आलेल्या ‘शिवगर्जने’ने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. तो नाद ऐकून जणू रायगडावरच हा सोहळा सुरू आहे की काय, असा भास सर्वांना झाला. शिवरायांचे विचार आणि त्यांचा स्वाभिमान आजही तितकाच जिवंत आहे, याची प्रचिती धाडनगरीतील या उत्सवाने पुन्हा एकदा करून दिली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवशंभू स्मारक समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक शिवभक्तांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
पोवाड्यांच्या सुरावटीत घुमला पराक्रम
केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने दिवसभर या ठिकाणी शिवगीते आणि महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे लावण्यात आले होते. कडाडणारी वीज आणि सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून येणारा आवाज जसा भासतो, तसाच अनुभव या पोवाड्यांमुळे येत होता. अफझलखान वध, शाहिस्तेखानाची फजिती आणि गड-किल्ल्यांचा विजयगाथा ऐकताना शिवभक्तांच्या मनात वीरश्री संचारली होती. नव्हेतर आजच्या या नियोजनामुळे आणि वातावरणामुळे आम्ही साक्षात शिवकाळात असल्याचा भास होत होता. स्मारकाची सजावट आणि शिवगर्जनेचा तो आवाज मनाला स्पर्शून गेला, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.
रणरागिणींच्या उपस्थितीने स्मारकाला झळाळी!
धाडनगरीतील या शिवजन्मोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि युवतींची लाभलेली विक्रमी उपस्थिती. छत्रपती शिवशंभू स्मारकावर शिवप्रभूंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी उसळली होती. जणू काही शिवरायांच्या स्वराज्यातील रणरागिणीच या ठिकाणी अवतरल्या आहेत, असे दृश्य दिवसभर पाहायला मिळाले.
‘घामातून साकारलेले स्वप्न’ 
हे स्मारक केवळ दगड-विटांचे बांधकाम नसून, अनेक कष्टकरी, गोरगरीब आणि घाम गाळणाऱ्या तरुणांच्या जिद्दीतून उभे राहिलेले एक ‘शिल्प’ आहे. अनेक अडथळे आणि आप्तस्वकीयांच्या कडव्या विरोधाला न जुमानता, केवळ शिवरायांच्या आशीर्वादाने उभे राहिलेले हे देखणे स्मारक पाहून महिलांच्या डोळ्यांत कौतुकाची थाप दिसत होती.
सेल्फीचा मोह अन् भक्तीचा संगम
डोळ्यांत साठवून ठेवावे असे हे विलोभनीय रूप पाहून उपस्थित महिला व युवतींना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. स्मारकाचे सौंदर्य आणि महाराजांची तेजपुंज मूर्ती आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या सोहळ्याचा आनंद जगभर पोहोचवला.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!