२४ तारखेपर्यंत अटक करा, अन्यथा २५ ला रणसंग्राम: मनोज जरांगे पाटील
मुलींचे कपडे फाटेपर्यंत मारहाण करणाऱ्यांना सोडणार नाही; चिखला काकडमधून दिला इशारा

आनंद इंगळे
सिंदखेड राजा, (प्रतिनिधी):चिखला काकड (ता.लोणार) गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात महिलांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले. आज २१ फेब्रुवारी रोजी त्यांनी चिखला काकड गाव गाठत पीडित कुटुंबांची भेट घेत घटनेचा सविस्तर आढावा घेतला. “ज्यांनी आमच्या आया-बहिणींवर हात टाकला, त्यांना सरकार पाठीशी घालत असेल तर गाठ माझ्याशी आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.
चिखला काकड गावात ३ फेब्रुवारी रोजी स्थापित केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला एका गटाने विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. २० फेब्रुवारी रोजी हा वाद विकोपाला गेला आणि दोन गट समोरासमोर आले. या हाणामारीत संजीवनी वाघ यांच्यासह इतर महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण झाली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील स्वतः मैदानात उतरले. नव्हेतर त्यांनी पीडित तरुणी आणि महिलांची विचारपूस केल्यानंतर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुन्ह्यातील सर्व दोषींवर कडक कलमे लावून त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत अटक करा. असे न झाल्यास २५ फेब्रुवारी रोजी चिखला काकड गावात मराठा समाजाच्या वतीने मोठे आंदोलन छेडले, असा इशारा देत ज्या जागेवर शिवरायांचा पुतळा स्थापित झाला आहे, तो तिथून हलवण्याला जरांगे यांनी तीव्र विरोध दर्शवला असून तो तिथेच राहिला पाहिजे, अशी भूमिका मांडली. पोलीस उपस्थित असताना मुलींचे कपडे फाटेपर्यंत मारहाण होते, हे लज्जास्पद आहे. दोषींना अटक करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा लढा आता केवळ पुतळ्याचा नाही, तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आहे, असेही जरांगे बोलतांना म्हणाले.
आतापर्यंत २१ जण ताब्यात
गावात सध्या पोलिसांचा मोठा ताफा तैनात असून आतापर्यंत २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा समाज मोठ्या संख्येने गावात जमा होत आहे. त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून पुढील ४८ तास गावच्या शांततेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.



