
शिवना,(प्रतिनिधी): देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाची पाठ फिरताच चोरट्यांनी आपले हात साफ केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे नुकतीच उघडकीस आली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ७ तोळे सोने, १ किलो चांदी आणि १ लाख ७० हजार रुपयांची रोख, असा एकूण १५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामुळे सिल्लोड तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली.
शिवना (जि.छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी असलेल्या वैशाली संजय गुप्ता या आपल्या कुटुंबासह ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेल्या होत्या. सुरुवातीला त्या नागपूरला एका विवाह सोहळ्यासाठी गेल्या आणि तिथून पुढे राजस्थानला खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी रवाना झाल्या. घर बंद असल्याचे पाहून पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी संधी साधली आणि रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे नेकलेस, झूमके, अंगठ्या, नथ (एकूण वजन ७ तोळे), चांदीचे पैंजण आणि चांदीची बिस्कीटे (वजन १ किलो) आणि १ लाख ७० हजार रुपये रोख, असा १५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.
१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेजाऱ्यांना गुप्ता यांच्या घराची कडी उघडी दिसली. घराच्या दरवाजाची अवस्था पाहून त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने ही माहिती राजस्थानमध्ये असलेल्या गुप्ता कुटुंबाला दिली. कुटुंबाने तातडीने गाव गाठले गाठून घराची झालेली अवस्था पाहिली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी वैशाली गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



