शेगाव,(प्रतिनिधी) : लोणार तालुक्यातील ग्राम चिकला येथे २० तारखेला घडलेल्या हिंसक घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत २३ आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चिखला काकड येथील घटनेत सहभागी असलेल्या समाजकंटकांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत २३ जणांना बेड्या ठोकल्या असून, व्हिडिओ फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी यावेळी बोलतांना दिली.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी आणि चिथावणीखोर पोस्ट शेअर करू नयेत, कोणत्याही वादाला तोंड फुटू नये यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर टाळावा. जर कोणाकडे घटनेसंदर्भात माहिती असेल किंवा काही अडचण असल्यास, थेट स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, चिखला येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून शांतता प्रस्थापित करण्यास मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले असून अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून कडक नजर ठेवून असल्याचेही तांबे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.