महाराष्ट्र माझा
अजितदादा पवार विमान अपघात: घातपात की निष्काळजीपणा?
सीआयडी तपासातील 'या' ३ बाबी ठरणार निर्णायक!

मुंबई,(प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह ५ जणांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अख्खा महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेला आता एक महिना पूर्ण होत असताना, या अपघाताचे गूढ अधिकच वाढत चालले आहे. आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेले सवाल आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताज्या माहितीमुळे हा अपघात होता की नियोजित ‘घातपात’, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा तपास केवळ अपघातापुरता मर्यादित नसून तो तीन मुख्य अँगलने सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विमानात जाणीवपूर्वक काही बिघाड करण्यात आला होता का? किंवा कोणा बाह्य शक्तीचा यात हस्तक्षेप होता का? विमान कंपनी ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते का? कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधील माहितीशी काही छेडछाड झाली आहे का?, हे तीन मुद्दे तपासाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
अजितदादा पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सीआयडी तपासात ‘घातपात’ निष्पन्न झाल्यास राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे आणि गरज पडल्यास सीबीआयची मदत घेण्याचे संकेत दिले आहेत,हे विशेष!
आ.रोहित पवारांचे खळबळजनक दावे
दरम्यान, अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात थेट विमान वाहतूक नियामक संस्था आणि विमान कंपनीवर निशाणा साधला असून पायलटचे फ्लाईंग अवर्स वाढवून दाखवण्यात आले होते. तसेच विमानाचे मेंटेनन्स रेकॉर्ड्स संशयास्पद असल्याचा दावा करत विमान कंपनीच्या मालकांविरुद्ध FIR दाखल करण्याची मागणी करत ‘सीआयडी’कडे काही महत्त्वाचे पुरावेही देखील सादर केले आहेत.
ब्लॅक बॉक्स आणि तांत्रिक गुंतागुंत
अपघाताच्या वेळी वैमानिकाचे शेवटचे शब्द “Oh S*”** असल्याचे रेकॉर्ड झाले आहेत, ज्यामुळे शेवटच्या क्षणी काहीतरी अनपेक्षित घडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ब्लॅक बॉक्स सध्या दिल्लीत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, त्याचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘एएआयबी’ तांत्रिक बाबी तपासत आहे, तर सीआयडी यातील गुन्हेगारी पैलू शोधत आहे.
वाचकहो, तुम्हाला काय वाटते?
हा केवळ तांत्रिक बिघाड होता की यामागे काही मोठे राजकीय षडयंत्र आहे? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की नोंदवा.



