
अभिनय बोर्डे
धाड (प्रतिनिधी):मजुरीच्या कामाला जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली ३० वर्षीय विवाहिता गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना नुकतीच रुईखेड मायंबा येथे समोर आली. याप्रकरणी धाड पोलिसांनी मिसींग दाखल केली असून महिलेचा शोध सुरू केला आहे.
अनवा (ता.भोकरदन जि.जालना) येथील रहिवासी असलेली मनिषा शाम इच्छे (वय ३० वर्षे ) ही महिला सध्या रुईखेड मायंबा (ता.जि.बुलढाणा) येथे आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मनिषाने ‘मी मजुरीच्या कामासाठी जात आहे’ असे घरात सांगितले आणि ती बाहेर पडली. दिवस मावळला तरी मनिषा घरी परतली नाही, त्यामुळे नातेवाईकांची चिंता वाढली. सुरुवातीला ती कामावर उशिरापर्यंत थांबली असावी, असे कुटुंबियांना वाटले. मात्र उशिरापर्यंत सुगावा न लागल्याने नातेवाईकांकडून तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही.मनिषा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिची बहीण सुनिता रमेश खंडागळे (वय ४५ वर्षे) आणि इतर नातेवाईकांनी रुईखेड परिसर, नातेवाईकांकडे आणि आजूबाजूच्या गावांत शोध घेतला. मनिषाच्या मुळ गावी म्हणजेच अनवा (ता.भोकरदन) येथेही चौकशी करण्यात आली, मात्र ती तिथेही मिळून आली नाही. अखेर पाच दिवसांच्या प्रयत्नांनंतर कोणतीही माहिती न मिळाल्याने, तिच्या कुटुंबियांनी १ मार्च २०२६ रोजी धाड पोलीस स्टेशन गाठून हरवल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी या प्रकरणी मिसींग दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार शांताराम जाधव हे करीत आहेत. बेपत्ता महिलेची उंची १५५ सेंटीमीटर, बांधा सडपातळ, रंग काळासावळा असून तिने अंगात जांभळ्या रंगाची साडी आणि ब्लाऊज घातलेले आहे. उपरोक्त वर्णनाच्या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास धाड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



