सैलानी यात्रेत धगधगली ‘नारळाची होळी’

बुलढाणा,(प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सुफी संतांच्या परंपरेतील एक महत्त्वाचे स्थान असलेल्या सैलानी (ता.बुलढाणा) येथील हजरत हाजी अब्दुर्रहमान ऊर्फ सैलानी बाबा यांच्या यात्रेला आज २ मार्च म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दुपारी ४ वाजता दरम्यान विधिवत पूजा करून होळी पेटवण्यात आली. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली जगप्रसिद्ध ‘नारळाची होळी’ पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी यात्रेत सर्वधर्मीय जनसागराचा महापूर लोटल्याचे यावेळी दिसून आले.

सैलानी बाबांच्या यात्रेला शतकाहून अधिक काळची परंपरा आहे. असे म्हटले जाते की, हजरत सैलानी बाबा हे दिल्लीतून भ्रमंती करत बुलढाण्यातील या पिंपळगाव सराई परिसरात आले होते. त्यांच्याकडे असलेल्या आध्यात्मिक शक्तीमुळे आणि जनसेवेमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांनी दिलेला शांततेचा आणि मानवतेचा संदेश आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी दर्गा उभारण्यात आला, जो आज सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बनला आहे. सैलानीची होळी ही संपूर्ण भारतात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते.मानसिक आजार किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव असलेल्या व्यक्तीने होळीचे दर्शन घेतल्यास त्याला आराम मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे यात्रेत दाखल झालेल्या हजारो भाविकांनी आपली पीडा, आजारपण आणि संकट दूर व्हावे म्हणून बाबांना बोललेला नवस नारळाच्या माध्यमातून होळीच्या अग्नीत अर्पण केला. आज पेटलेली ही लाखो नारळांमुळे पुढील काही दिवस धगधगत राहते. यातून निघणारी राख अत्यंत पवित्र मानली जात असल्याने सदर राख घरी घेऊन जाण्यासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातून भाविक आपल्या खासगी वाहनांनी यात्रेत दाखल झाले. आजची ही होळी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी आणि मनाला शांती देणारी ठरली.
८ मार्च रोजी निघणार संदल
होळीच्या मुख्य दिवसापासून म्हणजे आजपासून सुरू झालेली ही यात्रा पुढील १५ दिवस चालणार आहे. ८ मार्च रोजी पिंपळगाव सराई येथील संदल घरातून सैलानी बाबांची संदल मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत निघणार असून दर्ग्यावर चादर चढवणे आणि कुराण पठण यांसारखे विधी देखील होणार आहेत.
प्रशासकीय सज्जता आणि सुविधा
एवढ्या मोठ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने व्यापक तयारी केली असून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात शेकडो पोलीस कर्मचारी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. आरोग्यविभागाच्या वतीने तात्पुरते दवाखाने, रुग्णवाहिका आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात्रेच्या काळात अनेक सामाजिक संस्थांकडून भाविकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!