व्हिडिओ:’गांधीगिरी संपली, आता त्रिशूळ उठणार!’

अमरावती,(प्रतिनिधी): सोमवार, ९ मार्च २०२६ सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्यांना हादरे देणारा आणि मंत्रालयातील वातानुकूलित दालनांमध्ये घाम फोडणारा एकच आवाज आज मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यांत घुमला. “खूप झाली गांधीगिरी, आता वेळ आली आहे हातात त्रिशूळ घेण्याची!” मेळघाटातील आदिवासी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘मेळघाट संघर्ष यात्रे’ने आज चिखलदऱ्याच्या भूमीत रौद्ररूप धारण केले. प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य नेते आणि जनसामान्यांचे कैवारी बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिलेल्या ‘अंतिम इशाऱ्याने’ संपूर्ण राज्य प्रशासन हादरून गेले आहे.

आज दुपारी ४ वाजेपर्यंतची ‘फायनल डेडलाईन’ संपण्यापूर्वी बच्चू कडू यांनी उपस्थितांना संबोधित करताना शब्दांचे निखारे फेकले. ते म्हणाले, “आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गाने, गांधीगिरीने आमचे हक्क मागत होतो. पण हे सरकार बहिरे आहे. यांना गरिबांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत नाही, यांना फक्त संघर्षाची भाषा समजते. जर आज ४ वाजेपर्यंत आमच्या मागण्यांवर लेखी आश्वासन आणि अंमलबजावणी झाली नाही, तर आम्ही गांधीगिरीचा मार्ग कायमचा सोडणार आहोत. आमच्या हातात आता गुलाब नाही, तर अन्यायाचा नायनाट करणारा ‘त्रिशूळ’ असेल. त्यानंतर जो काही रणसंग्राम होईल, त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल”, असे सांगतानाच नऊ दिवसांच्या या संघर्ष यात्रेत बच्चू कडू यांनी मेळघाटातील भयावह वास्तव जगासमोर मांडले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी अद्याप कागदावरच आहे. मेळघाटातील आदिवासींच्या जमिनी, पाणी आणि रोजगाराचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून लोंबकळत आहे. सरकारी बाबू आणि स्थानिक राजकारण्यांच्या युतीमुळे विकासाचा निधी मधल्यामध्येच फस्त केला जात असल्याचा आरोप कडू यांनी केला.

सरकारच्या उरात धडकी: मंत्र्यांची पळापळ

बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा आणि त्यांच्या पाठीशी उभा असलेला हजारो समर्थकांचा जनसागर पाहून राज्य सरकारची झोप उडाली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आपले दोन संकटमोचक मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आबिटकर यांना विशेष विमानाने आणि हेलिकॉप्टरने चिखलदऱ्याला धाडले. मंत्र्यांच्या ताफ्याला चिखलदऱ्याच्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून जाताना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागला. ज्या मंत्र्यांकडे गेल्या अनेक महिन्यांपासून वेळ नव्हता, ते आज बच्चू कडूंच्या एका इशाऱ्यासरशी चिखलदऱ्याच्या आयटीआय मैदानावर लोटांगण घालण्यासाठी हजर झाले, हे कडूंच्या जनशक्तीचे यश मानले जात आहे.

पालकमंत्र्यांचा बेजबाबदारपणा

जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधताना कडू म्हणाले की, पालकमंत्र्यांना मुंबईतील राजकारणातून वेळ नाही आणि त्यांना मेळघाटातील कुपोषित बालकांच्या मृत्यूचे काहीच सोयरसुतक नाही.

मैदानावर समर्थकांचा महासागर

चिखलदऱ्याच्या आयटीआय मैदानावर आज जणू काही मानवी सुनामीच आली होती. हातात प्रहारचे झेंडे आणि डोळ्यांत अन्यायाविरुद्धची आग घेऊन हजारो आदिवासी बांधव, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने गोळा झाले होते. मंत्र्यांनी जेव्हा भाषणाला सुरुवात केली, तेव्हा समुदायाने “बच्चू कडू तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” आणि “कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मंत्र्यांना आपले म्हणणे मांडतानाही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

प्रशासन आणि पोलिसांची त्रेधातिरपीट

बच्चू कडूंच्या इशाऱ्याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा पोलीस ताफा चिखलदऱ्यात तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी स्वतः मैदानात तळ ठोकून आहेत. “जर कडू यांनी आंदोलनाची दिशा बदलली, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल,” अशी भीती गुप्तचर विभागाने आधीच व्यक्त केली होती. त्यामुळे संपूर्ण चिखलदरा छावणीचे स्वरूप धारण करून आहे.

आता चेंडू सरकारच्या कोर्टात!

दोन्ही मंत्र्यांनी बच्चू कडू यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली असून, बहुतांश मागण्यांवर ‘सकारात्मक विचार’ करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, बच्चू कडू हे केवळ आश्वासनावर थांबणारे नेते नाहीत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणीची ऑर्डर हातात पडत नाही, तोपर्यंत ही ‘संघर्ष यात्रा’ थांबणार नाही, तर ती मंत्रालयावर धडकणार आहे. आजची ही घटना केवळ एक आंदोलन नसून, प्रस्थापित सत्तेविरुद्ध सामान्य माणसाने पुकारलेले बंड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!