धक्कादायक: लोणार तालुक्यात वृद्ध महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): किरकोळ वादाचे रूपांतर अमानवीय कृत्यात झाल्याची एक संतापजनक घटना लोणार तालुक्यातील उदनापूर येथे घडली आहे. एका ६० वर्षीय मातंग समाजाच्या वृद्ध महिलेला जमिनीच्या वादातून मध्यस्थी करण्यास नकार दिला म्हणून, आरोपीने भररस्त्यात गाठून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर, जातीवाचक शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिकाबाई लक्ष्मण नेमाडे (वय ६०) या उदनापूर येथील रहिवासी आहेत. आरोपी रमेश अर्जुन मुळे आणि त्याचा पुतण्या संजय मुळे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरू आहे. या वादात भिकाबाईंनी मध्यस्थी करून समझोता घडवून आणावा, अशी आरोपीची इच्छा होती. मात्र, दोन्ही पक्षकारांमध्ये समझोता होऊ शकला नाही. याचाच राग मनात धरून आरोपीने वृद्ध महिलेवर हल्ला चढवला. १२ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास, भिकाबाई गावातील पिठाच्या गिरणीतून दळण आणण्यासाठी गेल्या होत्या. गिरणी बंद असल्याने त्या परतत असताना, आरोपी रमेश मुळे याने त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर भिकाबाईंना मागून येऊन कमरेत जोरात लाथ मारली. यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. तक्रारीनुसार, आरोपीने त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि अत्यंत खालच्या थराला जाऊन जातीवाचक शिवीगाळ केली. पीडितेने आरडाओरड केली असता, आरोपीने लज्जास्पद आणि अश्लील भाषेचा वापर करत त्यांचा विनयभंग केला. झटापटीत पीडितेच्या ब्लाउजची बाही फाटली असून, आरोपीने त्यांना जिवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी लोणार पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, २९६, ११५(२), ३५२ तसेच अनुसूचीत जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(१)(u), ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii), ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मेहकर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.

गावात तणावपूर्ण शांतता

या घटनेमुळे उदनापूर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. एका वृद्ध महिलेसोबत झालेल्या या गैरवर्तनामुळे सामाजिक संघटनांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. सध्या गावात शांतता असली तरी पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून गस्त वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!