अजय टप
मलकापूर (बुलढाणा): विजेचा कडाडून धक्का लागल्याने एका १८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मलकापूर तालुक्यातील वाघोडा येथे घडली आहे. अर्जुन शंकर सरदार असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
१३ मार्च २०२६ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास अर्जुन सरदार हा वाघोडा शिवारात होता. यावेळी अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. हा धक्का इतका भीषण होता की अर्जुन जागीच बेशुद्ध पडला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालय (मलकापूर) येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला ‘मृत’ घोषित केले. या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयामार्फत मलकापूर एमआयडीसी (दसरखेड) पोलीस स्टेशनला देण्यात आली. १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर नीरज क्षीरसागर आणि कक्षसेवक गवळी यांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. मृतदेहाचा ‘इनक्वेस्ट पंचनामा’ केला. डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी एमआयडीसी दसरखेड पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय टेकाळे हे करीत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागात वीज उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, तरुण मुलाच्या निधनाने सरदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.