राजकीय ‘कलगीतुरा’: चिखली-बुलढाण्यात फेसबुक वॉर!

चिखली,(प्रतिनिधी): राजकारणात कधी कोण कोणाच्या ‘आखाड्यात’ शड्डू ठोकून उतरेल याचा नेम नाही. सध्या असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. पण यावेळी हे युद्ध मैदानापेक्षा सोशल मीडियावर अधिक रंगताना दिसत आहे. निमित्त ठरलंय, आमदार श्वेताताई महाले यांचे पीए सुरेश इंगळे यांची एक फेसबुक पोस्ट, ज्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

आमदार श्वेताताई महाले यांचे पीए सुरेश इंगळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये कुणाचेही थेट नाव न घेता “वाचाळपणा” आणि “३५ कोटींचे कमिशन” यांसारखे शब्द वापरून जोरदार टोलेबाजी केली आहे. विशेषतः #कुणाची_माय आणि #३५कोटीचे_कमिशन या हॅशटॅगमुळे ही पोस्ट कोणाकडे रोख धरून आहे, याची चर्चा आता गल्लीबोळात सुरू झाली आहे. “शाळा शिकणे किती महत्त्वाचे आहे बघा, नाही शिकला की माणूस स्वतःचे कमिशन दुसऱ्याच्या मतदारसंघात खर्च करतो,” अशा शब्दांत त्यांनी एका बड्या नेत्याला चिमटा काढला आहे. हा सर्व वाद चिखली विधानसभा मतदारसंघातील ‘एन्ट्री’मुळे पेटल्याचे बोलले जात आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सध्या चिखलीमध्ये आपला संपर्क वाढवला असून, भाजप आणि काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घडवून आणण्याचा धडाका लावला आहे.चिखली आणि बुलढाणा हे दोन्ही मतदारसंघ सध्या या ‘फेसबुक वॉर’मुळे हॉट स्पॉट बनले आहेत. सुरेश इंगळे यांची ही पोस्ट म्हणजे केवळ वैयक्तिक मत आहे की हा मोठ्या राजकीय संघर्षाचा ट्रेलर, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, या पोस्टनंतर आता गायकवाड समर्थकांकडून काय ‘रिटर्न गिफ्ट’ मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • मतदारसंघाची अदलाबदल: स्वतःच्या मतदारसंघाचे सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात ‘शक्तीप्रदर्शन’ कशासाठी?, ३५ कोटींच्या कमिशनचा उल्लेख करून इंगळे यांनी नेमकी कोणत्या व्यवहारावर बोट ठेवले आहे?, या पोस्टमुळे आता शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप असा ‘मैत्रीपूर्ण’ पण तिखट संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहे.

२० वर्षांची पुण्याई अन् ‘छावा’चा दरारा!

चिखली विधानसभा मतदारसंघात सध्या सुरू असलेला त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सोहळे हे केवळ ‘आजचे’ नसून, त्यामागे गेल्या दोन दशकांचा झंझावाती इतिहास उभा आहे. भाजप, काँग्रेस आणि शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांचा गायकवाड यांच्याकडे असलेला ओढा हा केवळ आकस्मिक नसून, त्यांच्या जुन्या संघर्षावर आणि जनसंपर्कावर असलेला विश्वास आहे. त्यांच्या या राजकीय ‘एन्ट्री’मुळे जुन्या जाणत्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आले असून, विरोधकांच्या पोटात गोळा येणे स्वाभाविक आहे, अशा प्रतिक्रिया गायकवाड समर्थकांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!