अभिनय बोर्डे
धाड (प्रतिनिधी): प्रभू श्रीरामचंद्र हे संपूर्ण भारतभूमीचे आराध्य दैवत असून त्यांचा आदर्श आजही मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा आहे. याच भक्तीभावातून धाड शहरातील राम मंदिर आणि संत गजानन महाराज संस्थान येथे रामनवमीचा पवित्र उत्सव अत्यंत उत्साहात, श्रद्धापूर्वक आणि मांगल्याच्या वातावरणात पार पडला.

उत्सवाचे औचित्य साधून संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. झगमगाट करणाऱ्या दिव्यांमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. उत्सवानिमित्त संस्थानच्या वतीने विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर येथे सकाळी राम जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन महाआरती पार पडली. आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तर गजानन महाराज मंदिरात रामनवमीच्या पूर्वसंध्येला हभप अजाबराव महाराज (बोडखा) यांच्या सुश्राव्य वाणीतून हरीकीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा “झुंजार ते एक विष्णुदास जगी! पाप पुण्य अंगी नातळे त्या” हा अभंग निरूपणासाठी घेतला होता.
“भगवंताचे भक्त म्हणजेच ‘विष्णुदास’ हे खऱ्या अर्थाने झुंजार योद्धे असतात. ते नामस्मरणाच्या सामर्थ्याने प्रपंचातील संकटांशी लढा देतात आणि सदा सर्वकाळ ईश्वरी नामात तल्लीन असतात,” असे मार्मिक विवेचन महाराजांनी यावेळी केले.
श्रीराम जन्मोत्सव आणि महाप्रसाद
गुरुवारी, २६ मार्च रोजी रामनवमीच्या दिवशी सकाळी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून रामनामाचा जयघोष करण्यात आला. दुपारी १२ वाजता फटाक्यांची आतिषबाजी, पाळणा आणि अंगाई गीतांच्या सुरांमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. सायंकाळी प्रभू श्रीरामांची आरती करून भाविकांना महाप्रसादाचे (भंडारा) वाटप करण्यात आले.
विश्वशांतीसाठी प्रार्थना
या मंगल प्रसंगी संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे, विश्वामध्ये शांतता नांदावी आणि सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, यासाठी श्री संत गजानन महाराज भक्त परिवार, धाड यांच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या सोहळ्यासाठी धाड शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.