बुलढाणा,(प्रतिनिधी): अजिंठा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, ही भीती नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी उघड्यावर फेकलेले उरलेले अन्न खाण्यासाठी चक्क अस्वलांचे कुटुंब या निवासी परिसरात तळ ठोकून आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून म्हाडा कॉलनी परिसरात रात्रीच्या वेळी एक नव्हे, तर तब्बल तीन अस्वले सातत्याने वावरताना दिसत आहेत. वनविभागाच्या पाहणीनुसार, या भागात राहणारे नागरिक घरातील उरलेले अन्न कचराकुंडीत न टाकता घराबाहेर उघड्यावर फेकून देतात. याच अन्नाच्या वासाने अस्वले मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत. म्हाडा कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महिला सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर त्यामुळे या नागरिकांना, तसेच अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांवरही या अस्वलांच्या हल्ल्याची टांगती तलवार आहे. नव्हेतर वन्यजीव तज्ज्ञांनुसार, अन्नाच्या शोधात असलेली अस्वले माणसांच्या संपर्कात आल्यास आक्रमक होऊन हल्ला करण्याची दाट शक्यता असते, असे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी उघड्यावर अन्न टाकणे तातडीने थांबवावे. तुमच्या एका छोट्या हलगर्जीपणामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. वनविभाग गस्त घालत आहे, मात्र नागरिकांचे सहकार्य अनिवार्य आहे, असे आवाहन नगरपालिका व वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
- सावधान!
- वन्यप्राण्यांना मानवी वस्तीचे वेध लागणे ही धोक्याची घंटा आहे. वेळीच सावध होऊन कचरा व्यवस्थापन नीट न केल्यास, म्हाडा कॉलनी परिसरात रक्ताचा सडा पडण्यास वेळ लागणार नाही.