अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सध्या रोडछाप टवाळखोर आणि नशेडी युवकांनी उच्छाद मांडला असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “पोलीस प्रशासनाचा धाक संपला आहे का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत अखंड ब्राह्मण सेवा समितीच्या वतीने आज, ३० मार्च रोजी शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना धडक निवेदन देण्यात आले व ‘दामिनी पथक’ तात्काळ सक्रिय करण्याची मागणी करण्यात आली.
मलकापूर शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शहरातील नामांकित जनता कॉलेज आणि गोविंद विष्णू महाजन विद्यालय परिसरात शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत टवाळखोर युवक विनाकारण घिरट्या घालताना दिसतात. चिडीमारीचे (ईव्ह टीझिंग) प्रकार वाढल्याने विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक मुली भीतीपोटी किंवा बदनामीच्या धास्तीने पालकांना काहीही सांगत नाहीत, ज्याचा फायदा हे टवाळखोर घेत आहेत. हद्द तर तेव्हा होते, जेव्हा या टवाळखोरांना हटकणाऱ्या सुजाण नागरिकांना किंवा शिक्षकांनाही हे मग्रूर युवक दमदाटी करतात. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे या समाजकंटकांचे मनोबल वाढल्याचे चित्र सध्या मलकापुरात दिसत आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेले ‘दामिनी पथक’ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. गेल्या काही काळापासून हे पथक शहरात कुठेही प्रभावीपणे कार्यरत नसल्यानेच टवाळखोरांनी डोके वर काढले आहे, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. जर भविष्यात एखाद्या विद्यार्थिनीसोबत काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला सर्वस्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही अखंड ब्राह्मण सेवा समिती अध्यक्षा ॲड. अर्चना शुक्ला यांच्यासह निता कुळकर्णी, नंदा वैष्णव, अलका अंबुसकर, अश्विनी जोशी, भारती बैरागी, सुनिता डाकणे, ईश्वर दिक्षित यांनी दिला आहे. आता पोलीस प्रशासन या निवेदनानंतर कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन कारवाई करते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.