बुलढाणा जिल्ह्यात वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत लाखांचा दंड

अजय टप 

मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून, महावितरणच्या भरारी पथकाने आता कंबर कसली आहे. अलीकडेच खामगाव आणि बुलढाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत वीज चोरीचे दोन मोठे गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात हजारो रुपयांच्या वीज चोरीचा पर्दाफाश झाला आहे.

खामगाव-५० हजार रुपयांची वीज चोरी

खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जळवा पळसखेड (ता. शेगाव) येथील रहिवासी सोपान बळीराम खोंड (वय ६० वर्षे) यांच्या घरी महावितरणच्या भरारी पथकाने धाड टाकली होती. आरोपीने मागील १२ महिन्यांत एकूण २,२८६ युनिट्सची चोरी करून महावितरणचे अंदाजे ५०,२४० रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे.

या प्रकरणी वर्धा येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश नारायणराव श्रीवास यांनी फिर्याद दिली आहे. तडजोड रक्कम ४ रुपये भरण्यासाठी वेळ देऊनही ती न भरल्याने, विद्युत कायदा २००३ (सुधारित २००७) च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीगारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बुलढाणा शहर-दुसऱ्यांदा वीज चोरी केल्याने तडजोड नाकारली

दुसऱ्या एका कारवाईत बुलढाणा शहरातील विष्णूवाडी येथील वैशाली विष्णू गाढे आणि विष्णू सुखदेव गाढे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरारी पथकाने विष्णूवाडी येथील फ्लॅट नं. ८ वर छापा टाकला असता, तिथे ४७,०६० रुपयांची वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

विशेष म्हणजे, संबंधित ग्राहकाने वीज चोरीची रक्कम भरली असली, तरी ही त्यांची दुसरी वेळ असल्याने कायद्यानुसार त्यांच्याशी कोणतीही तडजोड करता येणार नाही. त्यामुळे बुलढाणा फिरत्या पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत उत्तमराव कलोरे यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार नामदेव खवले या प्रकरणाचा तपास करत आहेत. वीज चोरी करणे हा गंभीर गुन्हा असून, पकडले गेल्यास दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. नागरिकांनी अधिकृत वीज जोडणीचाच वापर करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!