जिल्ह्यात खळबळ: अवघ्या काही दिवसांत ८ महिला व तरुणी बेपत्ता; एका अल्पवयीन मुलीचे अपहरण!; जिल्ह्यात भीतीचे वातावरण; १८ वर्षीय तरुणींच्या गायब होण्याचे प्रमाण अधिक

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून महिला आणि तरुण मुली बेपत्ता होण्याच्या घटनांच्या सत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ३ एप्रिलपासून ते ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्याच्या विविध भागांतून तब्बल ८ महिला आणि तरुणी बेपत्ता झाल्या असून, यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंत्रज (खामगाव): २२ वर्षीय श्वेता कोल्हे बेपत्ता

खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील श्वेता उज्वल कोल्हे (वय २२ वर्षे) ही ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. वडील उज्वल कोल्हे यांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न मिळाल्याने अखेर ८ एप्रिल रोजी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तपास पोलीस अंमलदार भगवान काळबागे हे करत आहेत.

पहुरपुर्णा (शेगाव): १८ वर्षीय विद्या वानखडे गायब

शेगाव तालुक्यातील पहुरपुर्णा येथील विद्या धनराज वानखडे ही १८ वर्षांची मुलगी ८ एप्रिलच्या संध्याकाळी ‘शौचास जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडली, ती परतलीच नाही. आई बेबाबाई वानखडे यांच्या फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

बुलढाणा शहर: विवाहित महिला स्कुटीसह बेपत्ता

बुलढाणा शहरातील वृंदावन नगर भागातून सौ. सह्याद्री विजय तिवारी (वय ३३ वर्षे) या ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ‘बाजारात जाते’ असे सांगून ॲक्टिव्हा स्कुटीसह निघून गेल्या. बराच वेळ होऊनही त्या न परतल्याने पती विजय तिवारी यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

हनवतखेड (अपहरण): १६ वर्षीय आरती खसावत हिला संदीप गजानन गवई या तरुणाने प्रेमसंबंधातून फूस लावून पळवून नेले. आरोपीचा फोन बंद असून पोलीस शोध घेत आहेत.

करणखेड (अमडापूर): १८ वर्षीय पूजा खरात ही तरुणी ५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली.

आलेवाडी (सोनाळा): शबाना सलीम पाले (वय ३२ वर्षे) ही महिला आपल्या ७ वर्षांच्या मुलासह (दानिश) ३ एप्रिलपासून बेपत्ता आहे.

चिखली शहर: येथे दोन घटना घडल्या. रेणुका देवीच्या मिरवणुकीदरम्यान वाद झाल्याने विना चिंचोले (वय ५६ वर्षे) या घर सोडून गेल्या, तर दुसऱ्या घटनेत आरती उबरहंडे (वय १८ वर्षे) ही मावशीच्या घरून गायब झाली.

शिवाजीनगर व मांडणी: अपेक्षा बडोकार (वय १८ वर्षे) शिवाजीनगर आणि शुभांगी बिजोरे (वय १८ वर्षे) मांडणी या दोन तरुणी ४ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्या आहेत.

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

बेपत्ता झालेल्यांमध्ये १८ ते २२ वयोगटातील तरुणींची संख्या मोठी आहे. यामागे एखादी टोळी सक्रिय आहे का? किंवा काही संघटित प्रकार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हा पोलीस दलाचे विविध अधिकारी या प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!