धाड,(प्रतिनिधी): जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः धिंडवडा निघाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. जमिनीच्या किरकोळ वादातून एकाच समाजातील दोन गट समोरासमोर आले आणि बघता बघता या वादाचे रूपांतर रक्तरंजित युद्धात झाले. दुपारी २ ते २:३० च्या सुमारास झालेल्या या भीषण हाणामारीत लोखंडी रॉड आणि टामीने एकमेकांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून जागेवरून धुसफूस सुरू होती. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही धुसफूस उफाळून आली. दोन्ही बाजूचे तरुण आणि पुरुष रस्त्यावर उतरले. संताप इतका अनावर होता की, हातात येईल त्या वस्तूने एकमेकांवर वार करण्यास सुरुवात झाली. लोखंडी रॉड आणि टामीचा सर्रास वापर करण्यात आला. या हल्ल्यात दोन तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आरोपीचा पोलीस ठाण्यात आश्रय: संतप्त जमाव भडकला
हल्ला केल्यानंतर मुख्य आरोपीने आपला जीव वाचवण्यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तिथे जाऊन लपला. मात्र, यामुळे आगीत तेल ओतले गेले. जखमींच्या समर्थकांना ही माहिती मिळताच शेकडोचा जमाव पोलीस स्टेशनच्या दिशेने धावला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी प्रथम जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पवित्रा घेत लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे जमावाची पांगापांग झाली, मात्र परिसरात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. जागेच्या वादातून ही हाणामारी झाली आहे. जखमींवर उपचार सुरू असून, पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशा पोलिसांनी दिला आहे.