मेहकर,(प्रतिनिधी): सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हिवरा आश्रम येथे शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना विविध दाखले आणि सेवांचे जागेवरच वाटप करण्यात आल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार विजय पिंपरकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. शिबिराला उपविभागीय अधिकारी जोगी यांनी विशेष भेट दिली. त्यांनी शिबिरातील विविध विभागांच्या स्टॉल्सची पाहणी केली आणि उपस्थित शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेत असतानाच त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, सरपंच मनोहर गिऱ्हे आणि हिवरा आश्रम संस्थानचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते उपस्थित होते. यावेळी बोलतांना संजय वडतकर यांनी शासकीय यंत्रणा जेव्हा जनतेच्या दारी येते, तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होते, असे प्रतिपादन केले.
शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांची धावपळ होऊ नये म्हणून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने रेशन कार्ड व अन्न नागरी पुरवठा संबंधित कामे. निराधार व वृद्धपकाळ योजनेचे अर्ज. विविध प्रकारचे दाखले (उत्पन्न, जात इ.). मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन. मृदा परीक्षण आणि शेतीविषयक योजना. जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी दाखले, अशी विभागनिहाय मांडणी करण्यात आली होती. या नियोजित व्यवस्थेमुळे नागरिकांना आपली कागदपत्रे जमा करणे आणि माहिती घेणे अत्यंत सोपे झाले.
लाभार्थींना प्रमाणपत्रे व दाखल्यांचे वाटप
या शिबिरामध्ये केवळ अर्ज स्वीकारले गेले नाहीत, तर अनेक पात्र लाभार्थ्यांना जागेवरच सेवा देण्यात आली. यामध्ये उत्पन्न दाखले, मृदा परीक्षण अहवाल, विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, विविध शासकीय योजनांचे मंजुरी आदेश यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जमिनीची सुपीकता तपासण्यासाठी महत्त्वाचा असलेला ‘मृदा परीक्षण अहवाल’ मिळाल्याने शेतकऱ्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी काळे, मेहेत्रे, वैद्यकीय अधिकारी धांडे, आणि मंडळ अधिकारी मोगल यांनी आपापल्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः आरोग्य विभागातर्फे नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली, तर कृषी विभागाने आधुनिक शेती आणि सरकारी अनुदानाबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून तयारी केली होती. ग्राम महसूल अधिकारी शिवपाल राजपूत, सागर जायगुडे, परमेश्वर रहाटे, प्रविण गायकवाड, राहुल मोहिते यांनी समन्वयाची भूमिका बजावली. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी राहुल घुबे, अंकुश सोळंके, डोंगरे, खेडेकर,जाधव, ग्रामपंचायत अधिकारी बंगाळे, उज्वल म्हस्के, गणेश म्हस्के, पाटील, मवाळ आणि सेतू विभागाच्या सर्व चालकांनी अहोरात्र मेहनत घेतली. महसूल सेवक आणि सेतू चालकांच्या तत्परतेमुळे तांत्रिक कामे वेळेत पूर्ण झाली. हिवरा आश्रम आणि परिसरातील गावांमधून आलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.