बुलढाणा जिल्ह्यात खळबळ: ४८ तासांत तीन महिला आणि तीन मुले बेपत्ता; मिरवणूक आणि रात्रीच्या शांततेत माय-लेकींच्या अदृश्य होण्याने पोलीस यंत्रणा सतर्क!

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत गुन्हेगारीपेक्षाही अधिक चिंताजनक अशा ‘मिसिंग’च्या घटनांनी नागरिक हादरले आहेत. खामगाव शहर, मलकापूर आणि हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवघ्या ४८ तासांच्या अंतराने तीन विवाहित महिला आणि त्यांची तीन चिमुकली मुले बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये कुठे मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेण्यात आला, तर कुठे गाढ झोपेत असताना माय-लेकी गायब झाल्या आहेत. या घटनांमुळे जिल्ह्याच्या सामाजिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कुटुंबांचे रड रड रडून हाल होत आहेत.

खामगावच्या मिरवणुकीतून विवाहिता बेपत्ता; संशयाची सुई मलकापूरच्या तरुणाकडे

खामगाव शहरात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण होते. सर्वत्र मिरवणुका सुरू होत्या. याच गर्दीचा फायदा घेत आकांक्षा राजू घुगे (वय २४ वर्षे) ही महिला आपली मुलगी बहिणीकडे सोडून अचानक बेपत्ता झाली.

फिर्यादी राजू गुलाब घुगे (रा. ब्राह्मणवाडा, वाशीम, ह.मु. संभाजीनगर) यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी आकांक्षा ही १४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मिरवणुकीत होती. तिने आपली लहान मुलगी आपल्या मावसबहिणीकडे दिली आणि ‘मी येते’ असे सांगून ती गर्दीत शिरली. मात्र, त्यानंतर ती परतलीच नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, पण तिचा पत्ता लागला नाही.

या प्रकरणात फिर्यादीने मलकापूर येथील रहिवासी तेजस सुनील रायपुरे याच्यावर संशय व्यक्त केला आहे. आकांक्षा ही त्याच्यासोबतच निघून गेल्याचा संशय तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संतोष गव्हाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकांक्षाने निळ्या रंगाची साडी नेसलेली असून तिच्या उजव्या हाताच्या करंगळीत चांदीची अंगठी आहे.

मलकापुरात रात्रीच्या वेळी माय-लेक गायब; पतीला सकाळी बसला धक्का

मलकापूर शहरातील संचेती नगर (फुकटपुरा) भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री पतीसोबत झोपलेली पत्नी आणि ३ वर्षांची चिमुकली मुलगी पहाटे अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले.

इरफान शाह इनायत शाह (वय ३० वर्षे) हे आपल्या कुटुंबासह १५ एप्रिलच्या रात्री ११.३० वाजता घरी झोपले होते. १६ एप्रिलच्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास जेव्हा त्यांना जाग आली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांची पत्नी सुगरा बी (वय २१ वर्षे) आणि मुलगी फिरदोस परवीन (वय ३ वर्षे) या घरात नव्हत्या. घराचा दरवाजा उघडा होता. इरफान यांनी तातडीने सासरच्या घरी आणि परिसरात शोध घेतला, मात्र दोघींचाही थांगपत्ता लागला नाही.

सुगरा बी यांनी ऑरेंज रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला असून, चिमुकल्या फिरदोसच्या कपाळावर जुन्या जखमेचा वण आहे. पोलीस अंमलदार सुपेश झाल्टे या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

हिवरखेड परिसरात भरदुपारी माय-लेक बेपत्ता; गाव हादरले

खामगाव तालुक्यातील शिरला नेमाणे परिसरातूनही अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. दुपारी घरात सर्वजण असताना ३० वर्षीय महिलेने आपल्या ४ वर्षांच्या मुलासह घर सोडले.

अमोल शांताराम चव्हाण यांच्या पत्नी संगीता चव्हाण (वय ३० वर्षे) या १५ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता आपला मुलगा अर्णव (वय ४ वर्षे) याला घेऊन घरातून निघून गेल्या. भरदुपारी कुणालाही काहीही न सांगता त्या निघून गेल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. हिवरखेड पोलिसांनी या प्रकरणी ‘मिसिंग’ दाखल केली असून पोलीस अंमलदार रामेश्वर राठोड तपास करत आहेत. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे बुलढाणा पोलीस दलावर मोठा ताण आला आहे. या तिन्ही घटनांमध्ये काही साम्य आहे का, की या केवळ योगायोग आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

  • अवघ्या दोन दिवसांत तीन कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. लहान मुले सोबत असल्याने चिंतेचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. या महिलांनी स्वतःहून घर सोडले की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र, या घटनांनी संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.

One thought on “बुलढाणा जिल्ह्यात खळबळ: ४८ तासांत तीन महिला आणि तीन मुले बेपत्ता; मिरवणूक आणि रात्रीच्या शांततेत माय-लेकींच्या अदृश्य होण्याने पोलीस यंत्रणा सतर्क!

  1. ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत जाणे जास्त धोका दायक आहे. शहरातील लोकं स्वार्थी असतात. ते कोणाला मदत करण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र गावातील लोकं जागरूक असतात असे बोलले जाते,ते सामाजिक बांधिलकी ठेऊन समाजात गावात वावरत असतात. पण ती बांधिलकी दिसत नाही म्हणूनच असे गुन्हे घडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!