इंफाळ,(प्रतिनिधी): मणिपूरमध्ये गेल्या २४ तासांत परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. जिरीबाममध्ये बेपत्ता झालेल्या ६ जणांचे मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण राज्यात जनक्षोभाचा भडका उडाला आहे. आंदोलकांनी मंत्र्यांच्या घरांवर हल्ले केले असून, प्रशासनाने ७ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे.
सोमवारी जिरीबाममध्ये झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेल्या ६ जणांच्या शोधासाठी सुरक्षा दले सज्ज होती. मात्र, शुक्रवार संध्याकाळपासून धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. जिरीबामच्या बोरोबेक्रा भागातून बेपत्ता झालेल्या ६ पैकी ३ जणांचे मृतदेह आसाम-मणिपूर सीमेजवळील जिरी नदीत तरंगताना आढळले. यामध्ये एका महिला आणि दोन मुलांचा समावेश होता. शोधमोहीम सुरू असताना आणखी ३ मृतदेह त्याच परिसरात सापडले. अशा प्रकारे एकाच कुटुंबातील ३ महिला आणि ३ मुलांची क्रूर हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. हे मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले असून शवविच्छेदनासाठी आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत. सध्या संपूर्ण राज्यात ‘स्मशान शांतता’ आहे. सुरक्षा दलांच्या गाड्या रस्त्यांवर गस्त घालत आहेत, मात्र लोकांमध्ये असलेला संताप कधीही पुन्हा उफाळून येईल अशी स्थिती आहे. राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून केंद्राकडून मोठ्या हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे.
मंत्र्यांची घरे आणि कार्यालये लक्ष्य
मृतदेह सापडल्याची वार्ता समजताच इंफाळ खोऱ्यातील लोक रस्त्यावर उतरले. शनिवारी दुपारी आंदोलकांनी थेट सत्ताधारी नेत्यांच्या निवासस्थानांकडे मोर्चा वळवला. राज्याचे आरोग्य मंत्री सपम रंजन आणि ग्राहक व्यवहार मंत्री एल. सुसिंद्रो सिंग यांच्या निवासस्थानांवर संतप्त जमावाने दगडफेक केली आणि फर्निचरची तोडफोड केली. मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांचे जावई आणि आमदार राजकुमार इमोह यांच्यासह किमान ६ आमदारांच्या घरांवर आंदोलकांनी हल्ले केले. तसेच इंफाळच्या मुख्य रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे.
प्रशासनाची तातडीची कारवाई
हिंसाचाराची तीव्रता पाहता सरकारने राज्याला टाळेबंदीत टाकले आहे. अफवा रोखण्यासाठी इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, बिष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचांदपूर या ७ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद केली आहे. इंफाळ आणि जिरीबाममध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून ‘पाहताच क्षणी गोळ्या घालण्याचे’ आदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त निमलष्करी तुकड्या पाचारण केल्या आहेत.
राजकीय भूकंप: पाठिंबा काढला
या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राजकीय पडसादही उमटले आहेत. राज्यातील बिरेन सिंह सरकारला अपयशी ठरवत नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ने आपला पाठिंबा काढून घेण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे राज्यातील भाजप सरकारपुढील राजकीय संकटही गडद झाले आहे.