अजय टप
जलंब,(प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून किंवा फूस लावून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, तिच्यावर अत्याचार करत तिला गर्भवती ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जलंब पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना समोर आल्याने गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय उरले नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
पीडित मुलगी ही केवळ १७ वर्षे ११ महिन्यांची असून ती मूळची इंदूर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. आरोपी नरेश दिनकर बोके (वय २३ वर्षे) याने पीडितेच्या अल्पवयीन असण्याचा फायदा घेत तिला पळवून नेले. २१ मे २०२५ पासून ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने पीडितेवर वारंवार शारीरिक अत्याचार केले. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. हे प्रकरण केवळ एका मुलीच्या अपहरणाचे नसून, एका कोवळ्या जिवाच्या आयुष्याशी खेळण्याचा घृणास्पद प्रकार आहे. इंदूर ते डोलारखेड (ता. शेगाव) अशा दोन राज्यांच्या सीमेवर हे गुन्ह्याचे चक्र सुरू होते.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून जलंब पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२), ६४(२) सह कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे हे करीत आहेत.
समाजासाठी धोक्याची घंटा!
एकीकडे आपण महिला सुरक्षेच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे अशा विकृत मानसिकतेचे नराधम अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. १७ वर्षांची मुलगी, जिचे वय खेळण्या-बागडण्याचे आणि शिकण्याचे आहे, तिला अशा प्रकारे नराधमाने आपल्या जाळ्यात ओढून तिचे भविष्य अंधकारमय केले आहे. अशा गुन्हेगारांना समाजात जागा मिळता कामा नये, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.