अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात सध्या कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातून तरुण मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. दररोज पोलीस दप्तरी ‘मिसिंग’च्या नोंदी वाढत आहेत, पण या नोंदींमागचे गांभीर्य ओळखण्यात जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. १८ एप्रिल २०२६ हा दिवस तर जिल्ह्यासाठी ‘काळा दिवस’ ठरला, कारण एकाच दिवशी दोन तरुण मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे वाभाडे काढले आहेत.
पंधरा लाखांसह मुलगी लंपास; बुलढाणा शहरात खळबळ
बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. ओम साई अपार्टमेंटसमोर राहणारी १८ वर्षीय तरुणी, केतकी सखाराम भुसारी १८ एप्रिलच्या सकाळी ९ ते ११ च्या सुमारास अचानक बेपत्ता झाली. फिर्यादी सखाराम भुसारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी केवळ घर सोडून गेली नाही, तर घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले १५ लाख रुपये रोख घेऊन गेली आहे. संशयाची सुई साखळी खुर्द येथील उमेश सुरेश वाघ याच्याकडे जात आहे. भरदिवसा शहराच्या वर्दळीच्या भागातून मुलगी १५ लाख रुपये घेऊन गायब होते, तरीही पोलिसांना याचा सुगावा लागत नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. या घटनेला २४ तास उलटूनही तपासाची चक्रे संथ गतीने फिरत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
साखळी बुद्रुकमधून मध्यरात्री तरुणी गायब
दुसरी घटना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साखळी बुद्रुक येथे घडली. अवघ्या १८ वर्षे १९ दिवस वय असलेली चैताली रमेश बोराडे ही तरुणी १६ एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातून, आई आणि लहान भाऊ झोपलेले असताना कुणालाही काही न सांगता निघून गेली. १८ एप्रिल रोजी याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. निमगोरा रंग आणि साधारण पाच फूट उंचीची ही मुलगी कुठे गेली? की तिला फूस लावून पळवून नेण्यात आले? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या दोन्ही घटना पाहता, जिल्ह्यात तरुण मुलींना लक्ष्य करणारी एखादी टोळी तर सक्रिय नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील ही परिस्थिती ‘जंगलराज’कडे वाटचाल करत असल्याचे लक्षण आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडून जाईल. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आपली ‘कुंभकर्णी झोप’ सोडावी आणि या लेकी-बाळींना सुरक्षित घरी परत आणण्यासाठी कंबर कसावी. अन्यथा, संतापलेला जनसागर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही!
पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्षित’ धोरण
जिल्ह्यात एकही दिवस असा जात नाही की जेव्हा एखादी मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी येत नाही. मात्र, पोलीस दप्तरी याची नोंद केवळ एक ‘आकडा’ म्हणून केली जात आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी या प्रकरणांना अत्यंत हलक्यात घेत असल्याची ओरड सर्वसामान्यांकडून होत आहे. अनेकदा तक्रार घेऊन गेलेल्या पालकांना उलटसुलट प्रश्न विचारून अपमानित केले जाते. “मुलगी स्वतःहून गेली असेल”, “प्रेमप्रकरण असेल”, अशा प्रकारची उत्तरे देऊन तपासाची टाळाटाळ केली जाते.
पोलीस ठाणे प्रमुखांचा अजब कारभार
अनेकदा संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अशा प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात कुचराई करतात. बीट जमादार आणि तपास अधिकाऱ्यांकडे तपास सोपवून वरिष्ठ अधिकारी आपली जबाबदारी झटकतात. प्रत्यक्षात, अशा प्रकरणांमध्ये तातडीने सायबर सेलची मदत घेणे, मोबाईल लोकेशन ट्रॅक करणे आणि संशयितांची धरपकड करणे आवश्यक असते. मात्र, येथील प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते.
पालकांचे आत्मघातकी पाऊल
घरातील तरुण मुलगी बेपत्ता होणे, ही कोणत्याही कुटुंबासाठी सर्वात मोठी शोकांतिका असते. “मुलगी बेपत्ता झाली तर समाज काय म्हणेल?”, “नातेवाईकांना काय उत्तर द्यायचे?”, या विवंचनेत पालक रात्रंदिवस जळत असतात. अनेक प्रकरणांत, पोलिसांच्या असहकार्यामुळे आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने पालकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासनाची ही संवेदनशून्य वृत्तीच अशा दुर्दैवी घटनांना खतपाणी घालत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पोलीस अधीक्षकांकडे जनतेच्या नजरा
बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. केवळ ‘मिसिंग’ची नोंद करून प्रश्न सुटणार नाही, तर या मुलींना शोधून काढण्यासाठी विशेष पथके नेमण्याची गरज आहे. १५ लाख रुपये घेऊन गेलेल्या केतकीचा शोध असो वा मध्यरात्री गायब झालेल्या चैतालीचा, या दोन्ही प्रकरणांत पोलिसांना आपल्या कामगिरीची चुणूक दाखवावी लागेल. यासाठी पोलीस अधीक्षकांना स्वतः पुढाकार घ्यावा लागेल, अन्यथा परंपरागत तपासी पद्धत आणि आणि गुन्हा फायनल, हाच कित्ता पुढेही सुरू राहील, एवढे मात्र खरे!