शेगाव (प्रतिनिधी): श्रीक्षेत्र शेगाव येथील प्रसिद्ध आनंद सागर विरंगुळा केंद्राच्या पार्किंगमधून एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता चोरट्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीष प्रभु नवले (वय २३ वर्ष, रा. भौरद, ता. जि. अकोला) हा विद्यार्थी असून, तो १५ एप्रिल २०२६ रोजी शेगाव येथे आला होता. दुपारी १ ते ३ वाजेच्या सुमारास त्याने आपली एच एफ डिलक्स कंपनीची लाल-काळ्या रंगाची पांढरे पट्टे असलेली मोटार सायकल क्रमांक एमएच-३०-एएल-११५ ही आनंद सागरच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. काही वेळानंतर हरीष आपली दुचाकी घेण्यासाठी पार्किंगमध्ये परतला असता, त्याला आपली गाडी त्या ठिकाणी मिळून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही गाडीचा पत्ता न लागल्याने, आपली दुचाकी चोरीला गेल्याची खात्री त्याला पटली.
घटनेनंतर तीन दिवसांनी, १८ एप्रिल २०२६ रोजी हरीष नवले याने शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदारसुनील सुसर हे करीत आहेत.