पाणीपुरवठा व १५ वित्त आयोगातील गैरव्यवहारांविरोधात दुसरबीडमध्ये आमरण उपोषण सुरूच

दुसरबीड,(प्रतिनिधी): येथील ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारांविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. दिनांक २० एप्रिलपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या या उपोषणात गावातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायतीच्या आवक-जावक नोंदींमध्ये पारदर्शकता नसून घरपट्टी व नळपट्टी वसुलीच्या रकमेचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच आठवडी बाजार हक्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा गैरवापर, बनावट बिले तयार करून निधी वळविणे आणि विविध विकासकामांमध्ये अनियमितता केल्याचेही समोर आले आहे. या सर्व प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी हा आंदोलनाचा मुख्य मुद्दा ठरत असून, नवीन कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे वसूल करूनही अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संताप वाढला आहे. विशेषतः वॉर्ड क्रमांक १ व २ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बि.डी. घुगे व आर.एस. पवार यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, प्रस्तावित चौकशी समितीत लोणार पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने ती निष्पक्ष राहणार नाही, असा आरोप करत उपोषणकर्त्यांनी ही अट फेटाळून लावली. तसेच चौकशी समिती स्थापन झाल्याचे सांगितले असले तरी चौकशी नेमकी कधीपासून सुरू होणार याबाबत ठोस वेळापत्रक न दिल्याने प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपोषणकर्त्यांनी घंटागाडी व्यवस्थापन, आवक-जावक नोंदीतील तफावत, तसेच पाणीपुरवठा योजनेवर झालेल्या खर्चाचा तपशील तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीचे सचिव अशोक बुरकुल यांची तात्काळ बदली करून नियमित अधिकारी नेमण्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संगनमताने काही ठरावीक कंत्राटदारांना कामे देऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून मागवलेली माहिती वेळेवर न मिळाल्याने प्रशासनाविषयी अविश्वास वाढत आहे. तसेच गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवल्याचा मुद्दाही आंदोलनात पुढे आला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाकडे प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तोवर उपोषण सुरूच…

संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपसरपंच अशोक गुंजाळ,माजी उपसरपंचपती शेख तौफिक, ग्रामपंचायत सदस्यापती गजानन जगताप व सहयोगी ग्रामपंचायत सदस्य शेख अबरार,माजी उपसरपंच आलीया अंजुम, ग्रा.प.सदस्या साधना जगताप यांच्या सह आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!