बुलढाणा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सजग बालिकेच्या एका फोनमुळे टळला बालविवाह!

बुलढाणा,(प्रतिनिधी): एकीकडे समाज आधुनिकतेकडे झेपावत असताना दुसरीकडे बालविवाहासारख्या प्रथा अजूनही समाजमनाला विळखा घालून आहेत. मात्र, बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीच्या धाडसामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे एक बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. ही घटना २१ एप्रिल २०२६ रोजी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहीद बुद्रुक येथे घडली.

या संपूर्ण कारवाईचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पीडित मुलीने दाखवलेले धाडस. दहीद बुद्रुक येथे आपला बालविवाह लावून दिला जात असल्याची माहिती स्वतः त्या अल्पवयीन मुलीने पोलीस हेल्पलाइन ‘डायल ११२’ वर फोन करून दिली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी त्वरित पावले उचलली. त्यांनी पोलीस पथकात पोलीस अंमलदार भारत खंडारे, अनंता पाटील आणि चालक पोलीस अंमलदार लक्ष्मण सोळंकी यांची नियुक्ती करून त्यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले.

पोलीस पथक दहीद बुद्रुक येथे पोहोचल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासकीय घटकांना पाचारण केले. यामध्ये ग्रामसेविका मनिषा पवार, पोलीस पाटील श्रीकृष्ण राऊत, अंगणवाडी सेविका रेखा सुरुशे आणि सरपंच अर्जुन दांडगे यांचा समावेश होता. तसेच ‘चाईल्ड हेल्प लाईन’चे प्रकल्प समन्वयक शेख सोहब शेख हाफिस, चाईल्ड हेल्पर मुकेश नरेंद्र मोरे आणि केस वर्कर यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित बालविवाह वेळीच थांबविण्यात आला.

विवाह रोखल्यानंतर संबंधित बालिकेला तिच्या आईसोबत ‘बाल कल्याण समिती’ बुलढाणा यांच्यासमोर चौकशीसाठी हजर करण्यात आले. बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार, सध्या या बालिकेची रवानगी बाल गृहामध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणातील पालक आणि विवाह आयोजकांना कायदेशीर इशारा देण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!