बुलढाण्यातून अंगणवाडी मदतनीस महिला बेपत्ता; सुंदरखेड परिसरातील घटना, शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदरखेड भागातील एक ४३ वर्षीय महिला गूढरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिता गजानन इंगळे असे या बेपत्ता महिलेचे नाव असून, त्या व्यवसायाने अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी गजानन राजाराम इंगळे (वय ४८ वर्षे) रा. सुंदरखेड, बुलढाणा हे खामगाव रोडवरील तिरुपती बालाजी नगर भागात वास्तव्यास असून खासगी नोकरी करतात. १८ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी अनिता इंगळे यांनी ‘मी भावाच्या घरी जाते’ असे सांगून घर सोडले. मात्र, उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. नातेवाईकांकडे आणि परिचितांकडे चौकशी करूनही अनिता यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर गजानन इंगळे यांनी २० एप्रिल रोजी पहाटे बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठून पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, अनिता इंगळे यांच्यावर गेल्या काही काळापासून मानसिक आजारावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर बाहेकर यांच्याकडे त्यांचा उपचार सुरू असून, याच मानसिक स्थितीतून त्या कोठे तरी निघून गेल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुभाष म्हस्के हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!