‘भाजपचे खासदार तुमच्या विचारांचे नाहीत का?’ करुणा मुंडेंचा हल्लाबोल; महिला आरक्षणावरून भाजपचा बुरखा फाडला!

मुंबई,(प्रतिनिधी): “स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपकडे पूर्ण बहुमत आहे, त्यांचे शेकडो खासदार आहेत, तरीही महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी यांना मुहूर्त का सापडत नाही? याचा अर्थ स्पष्ट आहे, तुमचे स्वतःचे खासदार तुमच्या विचारांसोबत नाहीत,” अशा बोचऱ्या शब्दांत स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. नारी शक्तीच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या भाजपचा खोटेपणा आता उघडा पडला असल्याची टीका त्यांनी केली.

करुणा मुंडे यांनी भाजपच्या ‘नारी शक्ती’च्या दाव्यांमधील हवा काढून घेताना ऐतिहासिक दाखले दिले. त्या म्हणाल्या, “आज भाजप महिला आरक्षणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण विसरू नका की काँग्रेसच्या काळात या देशाने महिला पंतप्रधान, महिला मुख्यमंत्री आणि महिला राष्ट्रपती पाहिल्या आहेत. काँग्रेसने महिलांना पदे दिली, सन्मान दिला. भाजपने मात्र केवळ आरक्षणाचे गाजर दाखवून जागा वाढवण्याचा डाव आखला आहे. जागा न वाढवता आरक्षण द्यायची तुमची दानत का नाही?”, असेही मुंडे म्हणाल्या.

‘नाचणाऱ्या-गाणाऱ्यांना तिकीट देता आणि रिमोटवर चालवता’

मुंडे यांनी भाजपच्या उमेदवारी देण्याच्या पद्धतीवर अत्यंत आक्रमक टीका केली. त्या म्हणाल्या की, “आरक्षणाच्या नावाखाली भाजप स्वतःची पोळी भाजून घेत आहे. तुम्हाला खरोखर महिलांची कळकळ असेल, तर अशा महिलांना तिकीट द्या ज्या महिलांच्या प्रश्नांवर काम करतात. तुम्ही फक्त नाचणाऱ्या-गाणाऱ्या बायांना तिकीट देता, त्यांना निवडून आणता आणि नंतर त्यांना आपल्या ‘रिमोट कंट्रोल’वर चालवता. संसदेत किंवा विधानसभेत महिलांचे प्रश्न हिमतीने मांडणारी एकही आमदार-खासदार तुमच्याकडे नाही, कारण तुम्हाला फक्त ‘जी हुजूर’ म्हणणाऱ्या बाहुल्या हव्या आहेत.”, असेही त्या म्हणाल्या. बहुमत असतानाही आरक्षण लागू करायला वेळ का लागतोय?, तुमचे खासदार तुमच्या महिला आरक्षणाच्या विचारांशी सहमत नाहीत का?, फक्त ‘रिमोट कंट्रोल’वर चालणाऱ्या महिलांनाच तिकीट का दिले जाते?, आरक्षणाच्या नावाखाली स्वतःच्या जागा वाढवण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे का?, असे थेट सवालही त्यांनी उपस्थित केले.

‘आई उभी होती, पण तुम्ही मागच्या दाराने पळून गेलात!’

भाजपच्या नेतृत्वावर वैयक्तिक प्रहार करताना मुंडे यांनी एका घटनेचा उल्लेख केला. “एक आई न्यायासाठी तुमच्या दारात उभी होती, पण तिला भेटण्याची हिंमत तुमच्यात नव्हती. तुम्ही मागच्या दाराने पळून गेलात,” असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिलांचा सन्मान करण्याऐवजी त्यांचा वापर करणे ही भाजपची नीती असल्याची टीका त्यांनी केली.

आरक्षण द्या, पण राजकारण थांबवा!

“महिलांना आरक्षण नक्की द्या, पण त्या नावाखाली स्वतःचा फायदा बघू नका. ज्या महिला जमिनीवर काम करतात, ज्यांना प्रश्नांची जाण आहे, अशांना संधी द्या. नाचणाऱ्या-गाणाऱ्यांना संधी देऊन महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. करुणा मुंडे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता भाजप या टीकेला काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!