ओसंडून वाहतोय…मुलींच्या ‘बेपत्ता’ होण्याचा महापूर; २४ तासात पुन्हा ६ ‘मिसिंग’

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्याच्या शांततेला सध्या ‘बेपत्ता’ नावाच्या एका अदृश्य वादळाने वेढले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून ६ तरुण मुली आणि विवाहित महिला गायब झाल्या आहेत. पोलीस दप्तरी केवळ ‘मिसिंग’च्या निर्जीव नोंदी झाल्या आहेत, पण या आकड्यांच्या मागे उद्ध्वस्त होणारी कुटुंबं, रडणारे बाप आणि हतबल झालेले पती यांचा आक्रोश प्रशासनाला ऐकू येतोय का? असा जळजळीत प्रश्न आता ‘हिंदवार्ता’ विचारत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून रोज सरासरी ५ ते ६ मुली बेपत्ता होत आहेत. ही केवळ आकडेवारी नाही, तर ही जिल्ह्याच्या सामाजिक सुरक्षेला लागलेली वाळवी आहे. चिखली असो, शेगाव असो की चक्क ग्रामीण भागातील साखरखेर्डा – कुठेच मुली सुरक्षित नाहीत का? की त्यांना फूस लावून पळवून नेणाऱ्या टोळ्या आता पोलिसांपेक्षाही हायटेक झाल्या आहेत?, हे न उलगडणारे कोडे आहे.

साखरखेर्डा: ‘संडास’च्या बहाण्याने घातला पालकांना गंडा!

साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत बाळसमुद्र येथील घटना सर्वात जास्त चीड आणणारी आहे. गजानन साबळे यांची १९ वर्षांची मुलगी रेणुका ही दुपारी ३ वाजता ‘संडासला जाते’ असे सांगून डबा घेऊन निघाली. पण ती संडासला नाही, तर आपल्या आयुष्याचा ‘तमाशा’ करायला निघाली होती. धक्कादायक म्हणजे जाताना तिने सोबत शाळेची ओरिजिनल कागदपत्रे, आधारकार्ड आणि चक्क एसबीआय बँकेचे पासबुक सोबत नेले आहे. यावरून स्पष्ट होते की, हा प्रकार अचानक घडलेला नाही, तर हा एक ‘प्लॅन्ड’ कट होता. ज्ञानेश्वर डोंगरदिवे (रा. थार) याच्यासोबत ती फोनवर बोलताना आढळली होती, त्यावरून संशयाची सुई स्पष्टपणे त्याच्याकडे जाते. बापाने शेतमजुरी करून लेकीला शिकवलं, पण लेकीने बापाच्या कष्ट कवडीमोल ठरवलं.

चिखली: १८ वर्षांची होताच नियत फिरली!

चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत शेलूद येथील दिव्या अशोक नवले हिने तर वयाची १८ वर्षे पूर्ण होताच (१८ वर्ष १९ दिवस) घराला रामराम ठोकला. २१ तारखेच्या रात्री आईसोबत जेवण करून झोपलेली ही पोरगी सकाळी गायब झाली. दीपक ऊर्फ विराट शेळके नावाच्या तरुणाने तिला फूस लावली असावी, असा प्राथमिक संशय आहे. १८ वर्ष पूर्ण होताच ‘आम्ही स्वतंत्र आहोत’ म्हणणाऱ्या या पिढीला आपल्या पालकांच्या इज्जतीचं सोयरसुतक उरलं नाही का?

शेगाव: संतांच्या नगरीत हे काय सुरू आहे?

शेगावच्या कुंभारवाड्यातून रोशनी मनोहर बावसकर ही २१ वर्षांची सुशिक्षित मुलगी रात्रीतून गायब झाली. ज्या शहरात जगभरातून लोक शांतता शोधायला येतात, तिथे एका बापाला आपली पोटची पोरगी घरातून गायब झाल्यामुळे वणवण फिरावे लागत आहे. शिक्षण घेणाऱ्या मुली जर अशा प्रकारे कोणालाही काही न सांगता निघून जात असतील, तर शिक्षणाने नेमकी कोणती ‘जागृती’ होत आहे, हाच मोठा प्रश्न आहे.

विवाहितांचे ‘पिको-फॉल’ आणि ‘माहेर’ची कारणं!

अंढेरा: केवळ अविवाहित मुलीच नाही, तर संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलाही आता असुरक्षित किंवा ‘अस्वस्थ’ आहेत. ३६ वर्षीय राजश्री जावळे ही महिला साडीला पिको-फॉल करायला चिखलीला जाते म्हणाली आणि गायब झाली. अंगावर सोन्याचे दागिने, जांभळ्या रंगाची साडी आणि डोळ्यात नवी स्वप्नं घेऊन ती कोणाकडे गेली? जानेफळ: मंजु पांडव ही महिला ‘माहेरी रिसोडला जाते’ असे सांगून निघाली, पण ती ना माहेरी पोहोचली ना सासरी परतली. धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीतील ४५ वर्षांच्या सपना राहणे लालमाती फाट्यावरून बेपत्ता झाल्या.

प्रशासकीय यंत्रणेचा ‘थंडा’ प्रतिसाद?

पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, ‘मिसिंग’ची नोंद होते. मग तपास अधिकारी नेमले जातात. पण या तपासाचा वेग इतका संथ का? जर मोबाईल नंबर उपलब्ध आहेत, ज्यांच्यावर संशय आहे त्यांची नाव-गाव माहिती आहेत, तर पोलीस त्यांना तात्काळ बेड्या का ठोकू शकत नाहीत? जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये रोज ‘मिसिंग’चे अर्ज येत असतील, तर ‘सायबर सेल’ नेमके काय करत आहे?

सामाजिक की मानसिक अध:पतन?

जिल्ह्यातून रोज मुली बेपत्ता होण्यामागे केवळ ‘प्रेमप्रकरणं’ हे एकच कारण नाही. यामागे सोशल मीडियाचा अतिवापर, ‘इन्स्टाग्राम रिल्स’ची दुनिया आणि झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या टोळ्यांचा हात असण्याची दाट शक्यता आहे. साध्या ग्रामीण भागातील मुलींकडे आधारकार्ड आणि बँक पासबुक घेऊन पळून जाण्याची बुद्धी येते कुठून? त्यांना हे ‘ट्रेनिंग’ कोण देतंय?

पालकांनो, आता तरी जागे व्हा!

तुमची मुलगी शाळेत जाते की और कोणासोबत फिरते? ती तासनतास मोबाईलमध्ये कोणासोबत चॅटिंग करते? याकडे लक्ष देणे आता ‘गुन्हा’ नाही, तर तुमचं ‘कर्तव्य’ आहे. ‘लोक काय म्हणतील’ या भीतीपोटी अनेकदा पालक तक्रार करायला उशीर करतात, आणि याच संधीचा फायदा गुन्हेगार घेतात.

बुलढाणा जिल्ह्यात ‘मिसिंग’च्या प्रकरणांनी आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. साखरखेर्डा, चिखली, शेगाव, अंढेरा, जानेफळ आणि धामणगाव बढे या सहाही ठिकाणच्या पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. आता प्रतीक्षा आहे ती या बेपत्ता लेकींच्या सुखरूप परतण्याची आणि त्यांना पळवून नेणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची!

(टीप: ही बातमी वाचल्यानंतर शेअर करा, जेणेकरून बेपत्ता व्यक्तींचा शोध लागण्यास मदत होईल आणि पालकांमध्ये जागृती निर्माण होईल.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!