https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

धक्कादायक: मोताळा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; लग्नासाठी नकार देताच ‘खल्लास’ करण्याची धमकी!

अजय टप

बोराखेडी,(प्रतिनिधी): पवित्र नात्यांना काळिमा फासणारी आणि महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक संतापजनक घटना मोताळा तालुक्यात समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, तिचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमाविरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, नकार दिला तर तिच्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

तिघ्रा (ता. मोताळा) येथील रहिवासी असलेली १५ वर्ष ५ महिने वयाची मुलगी ‘आर्या’ (नाव बदललेले आहे) ही शिक्षण घेत आहे. साधारण एक महिन्यापूर्वी आर्या ही बबनराव देशपांडे शाळेजवळ उभी असताना, आरोपी गोकुळ ज्ञानदेव दिवाने (वय २२ वर्षे) रा. खैरा, ता. नांदुरा याने तिला अडवले. “मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्या मोटारसायकलवर बस,” असे म्हणत त्याने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. जेव्हा पीडित मुलीने त्याच्या गाडीवर बसण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा आरोपीने तिचे वडील आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून आर्या त्याच्या गाडीवर बसली. मात्र, थोड्या अंतरावर गेल्यावर तिने गाडी थांबवण्यास सांगितले. पीडितेने उतरण्याचा प्रयत्न केला असता, नराधम गोकुळने तिचा हात धरून विनयभंग केला आणि तिच्या छातीला स्पर्श करून लज्जास्पद वर्तन केले.

“जेलमधून सुटल्यावर खल्लास करेन”

ही घटना कोणालाही सांगितल्यास तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेन, अशी धमकी देऊन त्याने पीडितेचा पाठलाग सुरूच ठेवला. १८ एप्रिल २०२६ रोजी आर्या घरी एकटी असताना, आरोपीने तिच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला. फोन उचलताच त्याने पुन्हा लग्नाचा तगादा लावला. “माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी फाशी घेईन,” असे म्हणत त्याने भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

जेव्हा पीडितेने धैर्याने त्याला पोलिसांत तक्रार करण्याची ताकीद दिली, तेव्हा आरोपीचा खरा चेहरा समोर आला. एवढेच नाहीतर, त्याने पीडितेला धमकावत “तू माझ्या नावाचा रिपोर्ट दिलास तरी चालेल, पण मी जेव्हा जेलमधून सुटून येईन तेव्हा तुला खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली.

संपत्तीचे आमिष आणि मानसिक छळ

आरोपीने पीडितेला भुलवण्यासाठी आपल्या संपत्तीचे प्रदर्शनही केले. “माझ्याकडे ४ एकर जमीन, टिप्पर आणि कार आहे, मी तुला जीवापाड प्रेम देईन,” असे आमिष दाखवून तिला वश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने या दबावाला बळी न पडता सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या जिवाला असलेला धोका ओळखून तिच्या कुटुंबियांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गोकुळ ज्ञानदेव दिवाने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७८(२), ३५१(३) (४), पोक्सो कायद्याचे सहकलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि बालाजी शेंगेपल्लु हे करत आहेत.

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

दिवसाढवळ्या शाळकरी मुलींचा विनयभंग आणि त्यानंतर उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गुन्ह्यातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी तिघ्रा आणि मोताळा परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!