मलकापूर (प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात सध्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, ही कोंडी सोडवण्याऐवजी वाहतूक पोलीस चक्क ‘वसुली’मध्ये मग्न असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तहसील चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी नियुक्ती असूनही कर्तव्यावर हजर न राहता महामार्गावर जाऊन वाहनधारकांची लूट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध आता जनक्षोभ उसळला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी या संदर्भात पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला असून, कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
मलकापूर शहरातील तहसील चौक हा अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. येथूनच बुलढाणा, मुक्ताईनगर आणि नांदुरा या तीनही महत्त्वाच्या शहरांकडे जाणारे मार्ग फुटतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या चौकात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. तासनतास लागणाऱ्या जाममुळे रुग्णवाहिका, शालेय बसेस आणि सामान्य नागरिक अडकून पडत आहेत. तहसील चौकासह हनुमान चौक, टी-पॉईंट आणि बस स्थानक परिसरातही हीच परिस्थिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, जिथे वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची गरज आहे, तिथे पोलीस गायब असून शहरात वाहतुकीचा ‘रामभरोसे’ कारभार सुरू आहे.
बक्कल नंबर २३७४ चा ‘कारनामा’ उघड!
प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय टप यांनी दिलेल्या निवेदनात वाहतूक पोलीस कर्मचारी मोहन करांगळे (बक्कल नं. २३७४) यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर बोट ठेवले आहे. करांगळे यांची ड्युटी तहसील चौकात असतानाही ते तिथे थांबण्याऐवजी परस्पर महामार्गावर जाऊन थांबतात, असा आरोप करण्यात आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या हक्काच्या ड्युटीचे ठिकाण सोडून महामार्गावर जाण्याचे आदेश कोणी दिले? की हा निव्वळ अवैध वसुलीसाठी आखलेला प्लॅन आहे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
कायदेशीर पेच आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा
मोटार वाहन कायद्यानुसार, कोणत्याही दंडात्मक कारवाईनंतर त्याची ई-पावती किंवा छापील पावती देणे अनिवार्य आहे. पावती न देता पैसे घेणे हा सरळसरळ भ्रष्टाचाराचा आणि पदाचा गैरवापर करण्याचा प्रकार आहे. जर एखादा पोलीस कर्मचारी नियुक्त ठिकाणी न राहता इतरत्र आढळत असेल, तर तो ‘कर्तव्यावर गैरहजर’ मानला जातो. या प्रकरणात करांगळे यांच्यावर खातेनिहाय चौकशीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
‘प्रहार’चा इशारा: २७ एप्रिलपासून आमरण उपोषण!

शहरातील वाहतुकीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर पोलीस प्रशासनाने याकडे डोळेझाक केली, तर २७ एप्रिलपासून मलकापूर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अजय टप यांनी दिला आहे. खाकी वर्दीला कलंक लावणाऱ्या अशा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाते की, सामान्य जनतेला न्याय दिला जातो, याकडे संपूर्ण मलकापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.