https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

सोनाळा हादरले! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता सहा महिन्यांची गर्भवती

अजय टप

सोनाळा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नृशंस कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, या प्रकरणात सोनाळा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सोनाळा येथील रहिवासी असलेल्या शोभा राजेश शिंदे (नाव बदलले आहे) यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी रमेश राजू सोळंके याने त्यांच्या १६ वर्षीय मुलगी ‘लक्ष्मी’ (नाव बदलले आहे) हिला लग्नाचे जामिष दाखवले. प्रेमाच्या जाळ्यात ओढून रमेशने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरीरसंबंध ठेवले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.

जेव्हा ही बाब उघडकीस आली, तेव्हा आरोपी रमेश सोळंके याच्यासह त्याचे नातेवाईक आरोपी गणेश राजू सोळंके आणि आरोपी राजू काशीराम सोळंके यांनी पीडितेवर आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा लपवण्यासाठी आणि पीडितेचा आवाज दाबण्यासाठी आरोपींनी तिला रमेशसोबत पती-पत्नीसारखे राहण्यास भाग पाडले. फिर्यादी शोभा शिंदे यांनी जेव्हा याला विरोध केला, तेव्हा तिन्ही आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, “जर कुणाकडे तक्रार केली तर जीवे मारून टाकू,” अशी धमकीही या नराधमांनी दिली.

याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४(२)(f)(h)(j)(m), ६५(१), ४९, ६९, ३५२, ३५१(२)(३), ३(५). पोक्सो कायद्याचे कलम ४, ६, ८, १०, १२, १७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने हे करत आहेत.

समाजात संतापाची लाट

सोनाळा सारख्या ग्रामीण भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नाथजोगी समाजातील या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस आता पुढील कायदेशीर पावले उचलत आहेत. “अल्पवयीन मुलींवरील अत्याचार हे समाजासाठी घातक आहेत. या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू असून, आरोपींना कायद्याचा कठोर धडा शिकवला जाईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!