अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहराला सध्या वाहतूक कोंडीच्या भीषण समस्येने विळखा घातला आहे. शहरातील मुख्य बस स्थानक परिसरात दररोज ट्रॅफिक जामचा ‘कहर’ पाहायला मिळत असून, या गोंधळातून मार्ग काढताना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नियुक्त असलेले पोलीस नेमके कुठे गायब आहेत? असा संतप्त सवाल आता जनता विचारू लागली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मलकापूर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि विदर्भाचे प्रवेशद्वार आहे. मात्र, सध्या या प्रवेशद्वारात पाऊल ठेवताच प्रवाशांचे स्वागत लांबच लांब वाहनांच्या रांगा आणि धुराच्या लोटानी होत आहे. बस स्थानक परिसर हा शहरातील सर्वात गजबजलेला भाग आहे. येथूनच आंतरराज्य आणि जिल्हांतर्गत बस वाहतूक चालते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहतुकीची कोंडी पाचवीलाच पुजलेली आहे. तासनतास वाहने एकाच जागी अडकून पडत असल्याने प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे.
एकीकडे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना, दुसरीकडे वाहतूक पोलिसांचा या परिसरात पत्ताच नसतो, ही सर्वात गंभीर बाब आहे. “रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली की पोलीस गायब होतात की काय?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा किंवा कर्मचारी नसल्याचा फायदा बेशिस्त वाहनचालक घेत असून, यामुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे. जर या ठिकाणी पोलीस तैनात असतील, तर ते नेमके कुठे ड्युटी बजावत आहेत, हे शोधण्याची वेळ आता जनतेवर आली आहे.
चोरटे सक्रिय, महिलांमध्ये भीतीचे वातावरण
वाहतूक कोंडीचा फायदा फक्त बेशिस्त चालकांनाच होतोय असे नाही, तर गुन्हेगारांनीही यात आपली संधी शोधली आहे. बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि पाकीटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भररस्त्यात महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले जात आहेत. पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे चोरट्यांचे धाबे दणाणण्याऐवजी त्यांचे मनोबल वाढत असल्याचे चित्र आहे.
लग्नसराई आणि उन्हाचा पारा: परिस्थिती ‘बिकट’
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागातून हजारो नागरिक खरेदीसाठी शहरात येत आहेत. त्यातच सूर्याचा पारा ४० अंशांच्या वर गेल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. भर उन्हात लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडत आहेत. सर्वात भयावह म्हणजे, जीव वाचवणारी ‘रुग्णवाहिका’ आणि चिमुकल्यांना घरी नेणारी ‘शाळेची बस’ देखील या कोंडीतून सुटलेली नाही. एखादा गंभीर रुग्ण या ट्रॅफिकमुळे दगावल्यास त्याला जबाबदार कोण? असा जळजळीत प्रश्न आता विचारला जात आहे.
प्रशासनाकडून ‘ॲक्शन मोड’ची प्रतीक्षा
शहरातील ही विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी आता कठोर पावलांची गरज आहे. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या परिस्थितीची पाहणी करावी, अशी विनंती नागरिकांनी केली आहे. तसेच, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मलकापूरच्या या गंभीर समस्येकडे विशेष लक्ष देऊन जास्तीचा पोलीस ताफा या ठिकाणी तैनात करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का?
शहरातील ही परिस्थिती म्हणजे प्रशासनाच्या डोळेझाकपणाचा उत्तम नमुना आहे. तक्रारींचे ढीग साचलेले असतानाही पोलीस विभाग सुस्त का आहे? नागरिकांचा संताप अनावर झाला असून, जर येत्या दोन दिवसांत वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन कारवाई करते की पुन्हा ‘तारीख पे तारीख’ देऊन जनतेला वाऱ्यावर सोडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.