अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ वादातून होणाऱ्या हाणामारीपासून ते थेट दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्यांपर्यंतच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. भारतीय न्याय संहिताच्या कलमान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खामगाव येथे लग्नात नाचण्याच्या वादातून तरुणाची झालेली हत्या ही सर्वात धक्कादायक घटना ठरली आहे.
खामगाव: लग्नात नाचण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या
खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी मोहम्मद साबीर शेख मुसा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा शोएबखान अमिनखान (वय २२ वर्षे) हा बर्डे प्लॉट भागातील जोशी ले-आउट मैदानावर असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. आरोपी शेख आफताब, फैजान खान, शेख तालीब आणि शेख रफिक (अकोला) यांनी संगनमत करून शोएबखानवर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने डोक्यात व शरीरावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या शोएबखानचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), ११८ (२), ११५ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरी करत आहेत.
जळगाव जामोद: भाचीबद्दल अपशब्द बोलल्याने राडा
जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत जामोद गावात दोन भावांनी मिळून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. फिर्यादी सीताराम काशीराम रौदंळे यांनी तक्रार दिली की, आरोपी संजय नारायण दलाल याने त्यांच्या भावाच्या मुलीबद्दल अपशब्द वापरले होते.
याचा जाब विचारला असता आरोपी संजयने फिर्यादीला शिवीगाळ करून डोक्यात दगड मारून जखमी केले, तर दुसरा आरोपी राजू दलाल याने हाताने मारहाण केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार शेख इरफान हे करत आहेत.
मलकापूर: निष्काळजी वाहन चालवल्याने ४ वर्षीय बालकाचा पाय फॅक्चर
मलकापूर शहरात एका अज्ञात दुचाकी चालकाने ४ वर्षीय बालकाला धडक देऊन गंभीर जखमी केले. फिर्यादी प्रवीण दामोदर उमक यांचा मुलगा अर्णव हा नगीना मशीद समोरील रस्त्याने ट्युशनला जात असताना हा अपघात घडला. अज्ञात चालकाने दुचाकी भरधाव वेगाने चालवून अर्णवच्या उजव्या पायावरून नेली, ज्यामुळे बालकाचा पाय फॅक्चर झाला आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रिजवान शेख करत आहेत.
तामगाव: पाणी मागितल्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला
पिण्याचे पाणी मागितल्याच्या शुल्लक कारणावरून तामगाव येथे एका ५२ वर्षीय मजुराला बेदम मारहाण करण्यात आली. फिर्यादी मुकींदा ससाने ग्रामपंचायतीच्या ओट्यावर पाणी मागत असताना आरोपी राहुल बोदडे आणि गौतम जाधव यांनी वाद घातला. आरोपी राहुलने हातातील स्टीलच्या कड्याने फिर्यादीच्या डोळ्याखाली आणि ओठावर प्रहार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रामकिसन माळी हे करत आहेत.
शेगाव: जागेच्या वादातून विटेने हल्ला
शेगाव येथील धनगर फैल भागात जागेच्या वादातून शेजाऱ्यांनी गणेश देवकते यांच्यावर हल्ला केला. आरोपी विकी करे, उमा करे आणि कुंदाबाई करे यांनी फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली. जेव्हा गणेश वाद सोडवण्यासाठी गेले, तेव्हा विकीने विटेचा तुकडा मारल्याने गणेश यांच्या भुवईजवळ गंभीर जखम झाली. शेगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळगाव राजा: मजुरीचे पैसे मागितल्याने जीवे मारण्याची धमकी
मुरुम टाकण्याच्या कामाचे उर्वरित एक लाख आठ हजार रुपये मागितल्यामुळे शेख नासिर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपी गौरव तायडे याने “पैसे देणार नाही, पुन्हा फोन केला तर मारून टाकीन” असे फोनवर धमकावले. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
जलंब: चित्रीकरण रोखल्याने महिलेला काठीने मारहाण
जलंब येथील भीमनगर भागात घरगुती वादाचे मोबाईलवर शूटिंग करणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आली. फिर्यादी कविता गव्हांदे यांनी आरोपी राजेश इंगळे याला शूटिंग करण्यापासून रोखले असता, त्याने आणि सचिन फुलकर यांनी कविता यांना काठीने मारून जखमी केले. तपास अधिकारी नन्हेखा तडवी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.