अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, ग्रामीण आणि शहरी भागात सुसाट सुटलेल्या या व्यवसायांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता ‘ऍक्शन मोड’मध्ये येत कारवाईचा बडगा उगारला आहे. धामणगाव बढे आणि मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या २४ तासांत धाडी टाकून अवैध दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांच्या या कारवाया केवळ हातावर पोट असणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरच मर्यादित असल्याने, पडद्यामागून सूत्रे हलवणारे ‘बडे मासे’ अद्यापही मोकाटच असल्याचा सूर जनसामान्यांत उमटत आहे.
धामणगाव बढे: जिल्हा परिषद शाळेजवळ तंबाखू विक्रीवर धाड
पहिली कारवाई धामणगाव बढे पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली. जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती नापोका किशोर राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार पंचासमक्ष टाकलेल्या धाडीत आरोपी कलीम खा शबीर खा पठाण (वय ४२ वर्षे) रा. धामणगाव बढे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५ नग उंट छाप बिडी बंडल आणि १० नग गाय छाप तंबाखूच्या पुड्या, असा एकूण १५० रुपयांचा किरकोळ मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या कलम ६ आणि २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मलकापूर शहर: गावठी दारूच्या दोन कारवाया
मलकापूर शहरातही पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. पहिली कारवाई वानखेडे पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. येथे आरोपी गोपाल पुजाजी गवई (वय ६७ वर्षे) रा. उमाळी हा एका १५ लिटरच्या कॅनमध्ये १२ लिटर गावठी दारू (किंमत १,२०० रुपये) विक्री करताना आढळला. पोलीस अंमलदार संतोष कुमावत यांच्या तक्रारीवरून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दुसरी कारवाई शिवाजी नगर भागात करण्यात आली. पोलीस अंमलदार योगेश तायडे यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपी नेल्सन सिद्धार्थ तायडे (वय ३३ वर्षे) रा. वाकोडी याला १० लिटर हातभट्टीच्या दारूसह (किंमत १,००० रुपये) रंगेहात पकडण्यात आले. पोलीस अंमलदार शरद मुंढे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
शिक्षण संस्थांच्या परिसरातही तंबाखूचा विळखा
मलकापूर शहरातील जनता कॉलेज समोर सुरू असलेल्या तंबाखू विक्रीवरही पोलिसांनी छापा टाकला. पोका असिफ गफ्फार शेख यांनी केलेल्या या कारवाईत आरोपी रतन गजानन दाभाळकर (वय ४८ वर्षे) रा. एकतानगर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुलाब तंबाखू, गाय छाप आणि उंट बिडी असा एकूण ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अशा प्रकारे उघडपणे व्यसनाधीन वस्तूंची विक्री होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
‘बडे मासे’ सुटले, केवळ ‘छोटे मासे’ जाळ्यात!
पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या या कारवायांचे आकडे पाहिले तर एक धक्कादायक वास्तव समोर येते. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हा १००, ४०० किंवा १२०० रुपयांच्या घरात आहे. याचाच अर्थ, पोलीस केवळ किरकोळ टपऱ्या किंवा सायकलवर दारू विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करून आपली आकडेवारी फुगवत आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात लिटरच्या हिशोबात दारू पकडली जाते, पण ही दारू गाळणारे मुख्य ‘अड्डे’ आणि त्यांचे ‘मालक’ पोलिसांच्या नजरेतून कसे सुटतात?, कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या गुटखा किंग आणि तंबाखूच्या मोठ्या तस्करांपर्यंत पोलिसांचे हात का पोहोचत नाहीत?, शाळा-महाविद्यालयांच्या समोर उघडपणे व्यसनांची विक्री होत असताना, पोलीस केवळ अशा किरकोळ कारवाया करून ‘कर्तव्य पूर्ती’चा दिखावा करत आहेत का?, असे प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लक्ष
धामणगाव बढे आणि मलकापूर परिसरात अवैध धंद्यांचा ‘नंगानाच’ सुरू आहे. किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केल्याने हा धंदा बंद होणार नाही. जोपर्यंत या रॅकेटचे मुख्य सूत्रधार आणि ‘बडे मासे’ गजाआड जात नाहीत, तोपर्यंत सामान्य नागरिकांना आणि तरुण पिढीला या व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढणे अशक्य आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुख्य तस्करांवर कारवाई करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.