https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

बुलढाण्यात खाकीची गुंडगिरी! लोकशाहीच्या चिंधड्या उडवत वाचनवेड्या आंदोलकांवर पोलिसांचा ‘बळाचा’ नंगानाच

अजय टप

बुलढाणा,(प्रतिनिधी): ज्या मातीत छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर व्हायला हवा, त्याच बुलढाण्यात आज खाकी वर्दीतील ‘अहम’ आणि ‘अरेरावी’चा अतिरेक पाहायला मिळाला. ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक वाचण्यासाठी जमलेल्या शांतताप्रिय आंदोलकांना पोलिसांनी एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक देत, बळाचा वापर करून ताब्यात घेतले. लोकशाहीत शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला असताना, बुलढाणा पोलिसांनी मात्र आज आपल्या दंडुकेशाहीच्या जोरावर या अधिकाराचा गळा घोटला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेले हे ‘पुस्तक वाचन’ आंदोलन प्रशासनासाठी इतके डोकेदुखी ठरेल असे वाटले नव्हते. रोहित पवारांनी ऐनवेळी आपला दौरा रद्द केला असला, तरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले सुमारे २०० शिवप्रेमी आंदोलक जिजामाता प्रेक्षागार मैदानावर जमले होते. हातात पुस्तके घेऊन विचारांची लढाई लढणाऱ्या या तरुणांना पाहून पोलिसांच्या अंगात जणू ‘सैतान’ संचारला. पुस्तक वाचण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या आंदोलकांपैकी प्रकाशक प्रशांत आंबी यांना चिखली पोलिसांनी सकाळीच उचलले. ही ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ की विचारांची मुस्कटदाबी? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

४३ अंश तापमान आणि पोलिसांचा ‘अमानुष’ चेहरा

आज बुलढाण्यातील ऊन ४३ अंशांवर पोहोचले होते. आग ओकणाऱ्या या उन्हात महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत्या. आंदोलकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी जो मंडप टाकला होता आणि पिण्याच्या पाण्याची जी सोय केली होती, ती आधीच काढून घेतली. भर उन्हात उभे असलेल्या महिला आणि तरुणांना साधी सावली आणि पाणी मिळू न देण्याचा जो नीचपणा प्रशासनाने दाखवला, त्याने माणुसकीला काळिमा फासला आहे. आम्ही नियमांचे पालन करून शांततेत पुस्तक वाचतो, असे वारंवार विनवूनही अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह आलेल्या फौजफाट्याने आंदोलकांचे काहीही ऐकून घेतले नाही. उलट, बळाचा वापर करून त्यांना तेथून हुसकावून लावले.

काय पुस्तक वाचणे हा गुन्हा आहे?

महिला आणि तरुणींना ४३ डिग्री उन्हात तडफडू देणे हीच पोलिसांची ‘कार्यक्षमता’ आहे का? आंदोलकांचा मंडप आणि पाणी का काढल्या गेले? आजची ही कारवाई म्हणजे बुलढाणा पोलिसांच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याऐवजी लाठी आणि बळाचा वापर करणाऱ्या या प्रशासनाचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. पोलिसांनी जरी आंदोलन मोडीत काढले असले, तरी सामान्य जनतेच्या मनात पोलिसांच्या या ‘अरेरावी’बद्दल प्रचंड संताप धुमसतो आहे.

One thought on “बुलढाण्यात खाकीची गुंडगिरी! लोकशाहीच्या चिंधड्या उडवत वाचनवेड्या आंदोलकांवर पोलिसांचा ‘बळाचा’ नंगानाच

  1. वास्तववादी लिखाण केले थँक्यू निर्भीड पत्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!