अजय टप
नांदुरा,(प्रतिनिधी): नदीपात्रातून ओरबाडलेली निसर्गदत्त संपत्ती आणि रक्ताने माखलेला वाळूचा धंदा आता नांदुरा तालुक्यात शिगेला पोहोचला आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य जनता गाढ झोपेत असताना, नांदुरा-मोताळा रोडवरील वॉटर सप्लाय समोर भररस्त्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला. पोलिसांनी ३० लाखांचा मुद्देमाल पकडला असला तरी, या कारवाईने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ही कारवाई म्हणजे वाळू तस्करीच्या हिमनगाचे केवळ एक टोक आहे की प्रशासकीय डोळेझाक झाकण्यासाठी केलेला केवळ बनाव?
दिनांक २ मे २०२६ च्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास, जेव्हा रस्ते निर्मनुष्य असतात, तेव्हा तीन पिवळ्या रंगाची अशोक लेलँड वाहने एमएच-२८-बीबी-९३८९, एमएच-२८-बीबी-४९१३ आणि एक विना नंबर सहा ब्रास चोरीची वाळू घेऊन सुसाट वेगाने धावत होती. विशेष म्हणजे, यातील एका वाहनाला नंबर प्लेटही नव्हती! विना नंबरची वाहने शहरात बिनदिक्कतपणे कशी फिरतात? आरटीओ आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे याकडे लक्ष नसते की जाणूनबुजून कानाडोळा केला जातो? हे उघडपणे सुरू असलेले ‘सरकारी नियमांचे उल्लंघन’ प्रशासनाच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढणारे आहे.
महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत?
वाळू चोरी रोखण्याची प्राथमिक जबाबदारी ही महसूल विभागाची असते. मात्र, नांदुरा तालुक्यात गौण खनिजाची लूट होत असताना तहसीलदारांचे भरारी पथक नेमके कुठे असते? वाळू माफियांच्या खबऱ्यांचे जाळे इतके मजबूत आहे की, सरकारी गाडी बाहेर पडण्यापूर्वीच त्यांना माहिती मिळते. मात्र, या प्रकरणात पोलीस कर्मचारी विनायक देवानंद मानकर यांनी धडक कारवाई करून महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाळू तस्करीतून मिळणाऱ्या काळ्या पैशातील ‘हिस्सा’ कोणा-कोणाच्या खिशात जातो, हा आता चर्चेचा विषय बनला आहे.
३० लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या प्रकरणात नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) आणि गौण खनिज कायदा २१ (१), २१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुद्देमालाची किंमत ३० लाख १८ हजार रुपये आहे. कागदोपत्री कारवाई तर झाली, पण ही वाहने पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत आणि या तस्करांचे कंबरडे मोडले जाईल, याची खात्री प्रशासन देणार का?
आरोपींचे ‘मोताळा’ कनेक्शन आणि राजकीय वरदहस्त
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सागर संभाजी सोनोने (रा. मुर्ती, ता. मोताळा), अतुल मोहन येरवळ (रा. गिरोली, ता. मोताळा), लक्ष्मण उर्फ गणेश धोंडू चव्हाण (रा. वारुळी, ता. मोताळा) हे तिन्ही चालक मोताळा तालुक्यातील आहेत. शेजारील तालुक्यातून येऊन नांदुरा शहराच्या उंबरठ्यावर वाळूची तस्करी करण्याची हिंमत या चालकांमध्ये येते कुठून? यांच्यामागे बसलेला ‘खरा सूत्रधार’ कोण? केवळ चालकांना अटक करून प्रशासन आपल्या कर्तव्याची इतिश्री करणार का? की ज्यांच्या मालकीची ही ३० लाखांची वाहने आहेत, त्या ‘मोठ्या माशांना’ वाचवण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत? एक साधा शेतकरी आपल्या घरासाठी एक ट्रॉली वाळू नेतो तेव्हा त्याला दंड ठोठावणारे प्रशासन, रात्रीच्या वेळी विना नंबरच्या ट्रकधून होणारी ही महालूट रोखण्यात इतके हतबल का? की ही ‘हतबलता’ दर महिन्याला मिळणाऱ्या ‘पाकिटा’मुळे आहे?, अस सवाल उपस्थित होत आहे.
पुढील तपास की तडजोड?
सध्या या प्रकरणाचा तपास सफौ. इंगळे यांच्याकडे देण्यात आला आहे. ठाणेदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पारदर्शक होईल की प्रस्थापित राजकीय दबावाखाली हे प्रकरण थंडबस्त्यात जाईल, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार वराडे यांनी गुन्हा दाखल केला असला, तरी आता गरज आहे ती मुळावर घाव घालण्याची. जर प्रशासनाने आता कठोर पावले उचलली नाहीत, तर भविष्यात वाळू माफियांच्या दहशतीखाली नांदुरा तालुका पूर्णपणे ‘पोखरला’ जाईल, हे निश्चित!
