शेगाव,(प्रतिनिधी): संतापाची लाट आणि कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण करणारी एक संतापजनक घटना शेगाव शहरातील पी.पी. पाटील नगरमध्ये घडली आहे. पोटच्या मुलीला जाचातून वाचवण्यासाठी माहेरी आणणाऱ्या सासूवरच नराधम जावयाने हल्ला चढवत तिचा विनयभंग केला आणि पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शेगाव शहरातील पी.पी.पाटील नगरमध्ये राहणाऱ्या ४२) वर्षीय महिलेच्या मुलीने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवासी यश सुनील चंदनकत्री याच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच यशने मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पतीच्या छळाला कंटाळलेल्या मुलीला आधार देण्यासाठी महिलेने आठ दिवसांपूर्वी तिला आपल्या घरी शेगाव येथे आणले होते. २ मे २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास, आरोपी यश चंदनकत्री हा सूडाच्या भावनेने सदर महिलेच्या घरी पोहोचला. त्याने ‘बायको कुठे आहे?’, अशी विचारणा सासूकडे केली. तिने आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी ती मावशीकडे गेल्याचे सांगितले. बस, एवढाच बहाणा त्या नराधमाला पुरेसा झाला आणि आरोपी यशने आपल्या सासू-सासऱ्यांना भररस्त्यात अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिलेचे पती झाडांना पाणी घालत असताना, यशने त्यांना आणि महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच त्याचे मन भरले नाही, तर त्याने सर्व सामाजिक मर्यादा ओलांडत आपल्या सासूचा विनयभंग केला. झटापटीत त्याने फिर्यादीचा गाऊन फाडून टाकला आणि अत्यंत खालच्या थराची भाषा वापरत “तू माझ्यासोबत चाल, तुला बायकोसारखे वागवतो!, अशी मागणी घातली. “जर मुलीला माझ्या घरी पाठवले नाही, तर तुम्हा दोघांनाही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देखील दिली.
याप्रकरणी पीडित महिलेने शेगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी यश सुनील चंदनकत्री याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील सुसर हे करीत आहेत.
